मंगरूळ चव्हाळा/ सागर गावनेर
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा गावातील युवक एकत्र येऊन ग्रामपंचायत च्या भ्रष्ट निति विरूद्ध भिक मागो आंदोलन केले. कित्येक वर्षांपासून जाहिर ग्रामसभा होत नसल्याने व सर्व निर्णय चार भिंतींच्या आत घेतल्या जात असल्याने व्यवहारात पारदर्शकता राहिलेली नाही. म्हणून नियमित ग्रामसभा झाली पाहिजे, कामांचे, निधीचे, शिलकीचे, सर्व व्यवहारांचे फलक लावण्यात येऊन पारदर्शक व्यवहार ठेवावा तसेच आलेला शासकीय निधी व कंपन्या, कारखान्यांमधून मिळणारा निधी, कर तसेच भ्रष्टाचारांच्या आरोपांवर उत्तर देण्यात यावे

व गावातील सार्वजनिक शौचालय, रस्ते, नाल्या, स्वच्छता, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा या सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायतच्या निषेधार्थ भिक मागो आंदोलन करण्यात आले. गावातील तरूण एकत्र येऊन संपूर्ण गावात फिरले व एक एक रूपया भिक मागून जमा केले व याद्वारे ग्रामपंचायत ला सांगण्यात आले की, भीक मागून आणलेला हा निधी घ्या पण गावच्या विकासासाठी येणाऱ्या निधीमध्ये भ्रष्टाचार न करता तो गावच्या विकासासाठी च खुला करा. यासंबंधीचे वारंवार निवेदन ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी यांना दिलेले आहे परंतु अद्याप ग्रामसभा झालेली नाही व कुठलीच मागणी मान्य झालेली नाही म्हणून हि झालेली सुरूवात आणखी मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे युवकांनी सांगितले.
