SFI-DYFIच्या राज्यव्यापी आंदोलनाची नांदगाव खंडेश्वरात दखल
प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलनाला स्थगिती
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सरकारी शाळांचे संरक्षण, सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘शाळा वाचवा, शाळा सुधारा’ या राज्यव्यापी आंदोलनाची नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही सुरुवात करण्यात आली. पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
१ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता गटशिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रतिनिधींनी आंदोलकांना लेखी उत्तर पाठवून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात प्रशासनासोबत पुन्हा चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील शैक्षणिक व भौतिक परिस्थितीची पाहणी करण्याची सूचना प्रशासनास केली.प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली.

या आंदोलनात अब्दुल मोहसीन, किशोर शिंदे, विशाल शिंदे, राजगुरू शिंदे, राजा शेख, इमरान भाई, प्रवीण गावणार, संकेत मते, अभिषेक मारोडकर, आदित्य शिंदे व राजकुमार पाठक यांच्यासह SFI-DYFIचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.सरकारी शाळा टिकल्या तरच सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळेल, त्यामुळे शाळांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
