‘सन्मान सौदामिनिचा’ कार्यक्रमातून कर्तृत्वाचा गौरव
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना महिला कर्मचाऱ्यांना नोकरीसोबत कुटूंबाची जबाबदारी सांभाळण्याचे दुहेरी आव्हान असते. असे असतानाही, अमरावती जिल्ह्यातील महावितरणच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या सेवेसोबतच किडणी प्रत्यारोपणाच्या सामाजिक चळवळीला गती दिली आणि काहींनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून महावितरणचा नावलौकिक वाढवला आहे.
या ‘सौदामिनीं’चा महावितरणला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले.नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महावितरणतर्फे अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘सन्मान सौदामिनिचा’ या विशेष सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सहाय्यक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे, संजय शृंगारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कल्पना भुले यांच्यासह जिल्ह्यातील महावितरणच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या सोहळ्यातून महावितरणमध्ये कार्यरत महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी विचार मांडतांना आद्यश्री कांबे म्हणाल्या की, महिलांनी समाज कार्यासाठी आपल्या स्त्री शक्तिचा वापर करावा. सहाय्यक विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आद्यश्री कांबे यांनी स्व-अनुभवातून प्रेरणा घेत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून किडणी प्रत्यारोपण कार्यास योग्य व्यासपीठ व कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे त्यांना ‘सर्वोत्कृष्ट विदर्भ महिला २०२५‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रूपाली खोब्रागडे यांनी सामाजिक कार्याचे छंद जोपासण्याचे आव्हान केले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन विविध संघटनांनी त्यांना ‘नवचेतना समाजरत्न’, ‘महाराष्ट्र समाजभूषण’ आणि ‘राष्ट्रमाता मातृसन्मान‘ अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच येथे कार्यरत आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी संलग्न असलेल्या वैशाली अग्निहोत्री म्हणाल्या की,महिलांना स्वताला सक्षम बनवायला हवे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ आणि भारतीय सैन्याकडून देण्यात येणाऱ्या ‘मेरी संतान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय,तंत्रज्ञ असलेल्या माधुरी वानखडे यांनी ग्राहकसेवेला समर्पित काम करण्याचे आव्हाने केले. एल.एल.बी. सारखे उच्च शिक्षण पूर्ण करत माधूरी वानखडे यांनी आवड जपल्याने एक उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून जिल्ह्यात त्यांचे नाव आहे. तर जनमित्र म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा कांबळे म्हणाल्या की, पारंपरिक वृत्तीला छेद देत महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी वीज क्षेत्राच्या आव्हानात्मक कामातही सिध्द करण्याचे आव्हान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विकास बांबल यांनी केले, तर किरण रोहणेल यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.
