वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने विद्युतपुरवठा खंडित
तात्पुरते शेड, मंडप व संरचनांचे मोठे नुकसान
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी परिसरात सोमवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला.वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणचे तात्पुरते शेड, मंडप व संरचना जमीनदोस्त झाल्या. शेतशिवारातील तसेच गावालगतच्या भागातील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज वितरण यंत्रणेलाही फटका बसल्याने काही भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवर झाडे व फांद्या पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. पावसाचा जोर आणि वादळामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. सुदैवाने जीवितहानीची कोणतीही घटना घडली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे पंचनामे करून तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे.

“वादळाच्या तडाख्याने आमच्या रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले. एका क्षणात उभा व्यवसाय उद्ध्वस्त झाला. प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा.”
— रोशन पुनिया, अंजनगाव बारी
