डॉक्टर-ANM व औषधांअभावी चार-पाच गावांतील नागरिकांची गैरसोय.
गरोदर महिला, बालक व वृद्धांना १०-१२ किमीचा प्रवास.
१५ दिवसांत आरोग्य कर्मचारी नियुक्त न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा; हितेश शेळके
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथे नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सध्या डॉक्टर, आरोग्य सेविका आणि औषधांअभावी केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा आरोप होत आहे. सुसज्ज इमारत उभी असतानाही प्रत्यक्ष आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने फुबगावसह परिसरातील चार-पाच गावांतील नागरिकांना उपचारासाठी नांदगाव खंडेश्वर येथे धाव घ्यावी लागत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून उपकेंद्रात नियमित आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः गरोदर महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना साध्या ताप, सर्दी, रक्तदाब किंवा इतर किरकोळ आजारांसाठीही १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करून नांदगाव खंडेश्वर येथे जावे लागत आहे. अचानक एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाला वेळेत उपचार मिळणेही कठीण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळ प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी शासनाच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्रांची उभारणी करण्यात येते. इमारत उभारूनही त्याठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि औषधांची उपलब्धता नसेल, तर या योजनेचा उद्देशच निष्फळ ठरतो. फुबगाव येथील परिस्थिती याचाच प्रत्यय देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते तसेच रोहित पवार फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष हितेश शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी निवेदन सादर करून फुबगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात तातडीने डॉक्टर आणि एएनएमची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.हितेश शेळके यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, फुबगाव येथे लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली आहे; मात्र आतमध्ये डॉक्टर नाही, आरोग्य सेविका नाही आणि पुरेशी औषधेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही इमारत नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी उपयोगी पडण्याऐवजी केवळ शोभेची वस्तू बनली आहे.

गरोदर माता-भगिनी, लहान मुले आणि वृद्धांना उपचारासाठी १०-१२ किलोमीटर दूर जावे लागत असल्याने हा प्रश्न केवळ गैरसोयीचा नसून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना वारंवार प्रवासाचा खर्च आणि वेळेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
१५ दिवसांत डॉक्टर व ANM नियुक्त न केल्यास आंदोलन
प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घेऊन फुबगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर आणि एएनएमची नियुक्ती करावी, तसेच आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत मागणीची पूर्तता न झाल्यास रोहित पवार फाउंडेशनच्या माध्यमातून उपकेंद्रासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हितेश शेळके यांनी दिला आहे.
फुबगावसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत आणि उपकेंद्र प्रत्यक्ष सेवेत सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. “जनतेच्या आरोग्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” येत्या १५ दिवसात सदर आरोग्य केंद्र सुरू न झाल्यास याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
– हितेश शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) नांदगाव खंडेश्वर
