अंजनगाव बारी सर्कलसह १६ गावांचा झंझावाती दौरा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी
आठ दिवसांत भरपाई न मिळाल्यास कठोर आंदोलनाचा इशारा
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अमरावती जिल्ह्यात बूस्टर, देव, महादेव, हूतूतू कंपनीच्या कथित निकृष्ट व बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना आमदार रवि राणा यांनी मंगळवारी (१४ जुलै) अंजनगाव बारी सर्कलमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवणच न झाल्याचे वास्तव समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषी कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची, जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या पेरणीसह दुबार पेरणी व संपूर्ण कर्जखर्चाची भरपाई देण्याची जोरदार मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली.

यावेळी आमदार रवि राणा म्हणाले की, “शेतकऱ्याने कर्ज काढून, उसनवारी करून बियाणे खरेदी केले. मात्र बोगस बियाण्यांमुळे त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. हा केवळ आर्थिक फसवणुकीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचा प्रकार आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.” यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करून प्रत्यक्ष मदत न मिळाल्यास संबंधित कंपनीच्या मालकाला जाब विचारत तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात आमदार रवि राणा यांनी अंजनगाव बारी, पार्डी(देवी) , वडगाव जिरे, उदखेड, अऱ्हाड, कुऱ्हाड, कस्तुरा, मोगरा, भानखेड (बु.), भानखेड (खु.), पोहरा, बोडना, पिंपळखुटा, इंदला, मासोद, परसोडा आणि हातला या गावांचा झंझावाती दौरा करत शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. अनेक शेतांमध्ये बियाणे उगवले नसल्याचे आणि दुबार पेरणीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र त्यांनी पाहिले.

पाहणीदरम्यान उपस्थित उपविभागीय अधिकारी पंकज चेंडे, तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम व जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे भरपाईचा प्रस्ताव त्वरित पाठविण्याचे कडक निर्देश आमदार रवि राणा यांनी दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी पंकज चेंडे, तालुका कृषी अधिकारी भोसले मॅडम, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, भातकुली तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले पाटील, आशिष कावरे, गौतम खंडारे, श्रीकृष्ण बैलमारे, सुमेध खांडेकर, बाबू पाटील, राजा बांगडे, निखिल आकोटकर, ज्ञानेश्वर कळसकर, महेंद्र सिरसाठ, रुपेश कळसकर, ज्ञानेश्वर काळे, पंकज थोरात, प्रविण चौखट, अंकुश यादगीरे, ज्ञानेश्वर यादगीरे, प्रकाश माहोड, गंगाधर मालठाने, वैभव यादगीरे, दिनकरराव मेश्राम, योगेश साबळे, मदन देशमुख, भूषण वाहने, जितू सोळंके, पार्डीचे सरपंच अक्षय मेश्राम, बंडू डकरे, युवा स्वाभिमान पार्टी तालुका अध्यक्ष अजय धुले तसेच पार्डी परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे फसलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्ता भरणे आणि पालकमंत्र्यांकडे ठामपणे मांडला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय व मदत मिळावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.”
– आ. रवि राणा, बडनेरा मतदारसंघ, अमरावती
