२७ वर्षांपासून मंजुरी कागदावरच; प्रशासनाच्या दिरंगाईने नागरिक संतप्त.
स्वच्छतागृह, पाणी आणि वीज सुविधांअभावी चौकी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
गुन्हा घडला तर पोलिस कुठे? आणि गरज पडली तर तात्काळ मदत मिळणार कुठून? नांदगाव खंडेश्वर बसस्थानक परिसरात येणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मनात हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. कारण,शासनाने १९९९ मध्ये मंजूर केलेली पोलिस चौकी आज तब्बल २७ वर्षांनंतरही केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा आणि संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसस्थानक परिसरात दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते.मात्र अशा ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मौल्यवान वेळ निघून जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे,चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या किरकोळ सुविधांमुळेच हा प्रश्न रखडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस चौकी मंजूर असूनही सुरूच करण्यात आलेली नाही त्यामुळे ती सुरू करण्यासाठी पोलिस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची, नगरपंचायतीकडे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्याची आणि वीज वितरण कंपनीकडे विद्युत पुरवठा सुरू करण्याची अनेकदा लेखी मागणी केली. मात्र, संबंधित विभागांकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने चौकी बंद असल्याचे कारण दिले जात आहे.यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “चौकी मंजूर आहे, इमारत आहे; मग सुरू होण्यापासून अडथळा नेमका कोणाचा?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ तीन मूलभूत सुविधांअभावी वर्षानुवर्षे पोलिस चौकी बंद ठेवणे ही प्रशासनाची उदासीनता असल्याची टीका होत आहे.दरम्यान,भविष्यात या परिसरात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार,असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित विभागांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत आणि बसस्थानक परिसरातील पोलिस चौकी तात्काळ सुरू करावी, अशी जोरदार मागणी नांदगाव खंडेश्वरकरांकडून करण्यात येत आहे. सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब म्हणण्याची वेळ आता नांदगाव वासीयावर आलेली असून आता प्रश्न एकच… २७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पोलिस चौकीचा मुहूर्त अखेर कधी निघणार? नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
