महागाईचा भडका उडण्याची शक्यता
अंजनगाव बारी /पवन इंगोले
जागतिक स्तरावरील वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय इंधन बाजारावर होत असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांदा दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात इंधनदरवाढीची मोठी चर्चा असून वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंगळवार, १९ मे २०२६ पासून देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली. याआधीच १५ मे रोजी पेट्रोलमध्ये ₹३.१४ आणि डिझेलमध्ये ₹३.११ अशी मोठी वाढ नोंदवली गेली होती.अमरावती जिल्ह्यात या वाढीनंतर पेट्रोलचा दर ₹१०८.१४ प्रति लिटर, तर डिझेलचा दर ₹ ९४.५२ – ₹९४.५८ प्रति लिटर इतका झाला होता. नव्या वाढीनुसार पेट्रोल ८७ पैसे, तर डिझेल ९१ पैसे प्रति लिटरने महागले आहे. एप्रिल २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.मध्यपूर्वेतील वाढता लष्करी तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहतुकीतील अडथळे, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील तूट आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता ही या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदीवरील सवलती नाकारल्यानंतर जागतिक बाजारात तुटवडा वाढला असून त्याचा मोठा परिणाम भारतासह आशियाई देशांवर दिसून येत आहे.इंधनदरवाढीचा सर्वात मोठा परिणाम वाहतूक क्षेत्रावर होणार असून मालवाहतूक, कृषीउपयोगी उपकरणे, प्रवासी वाहतूक सेवा आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक आणि रोजंदारीने प्रवास करणारे नागरिक यांच्यावर या वाढीचा थेट बोजा पडणार आहे. घरगुती एलपीजीच्या किमती मात्र स्थिर आहेत. अमरावती जिल्ह्यात १४.२ किलोचा घरगुती सिलेंडर ₹९३७.५ रुपयांवर कायम आहे. परंतु व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलोचा सिलेंडर ₹३,००० रुपयांच्या वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ₹९९३ रुपयांच्या मोठ्या वाढीनंतर छोटे हॉटेल व्यवसाय, चहा-नाश्ता केंद्रे, ढाबे आणि रेस्टॉरंट्स यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.या सततच्या इंधनदरवाढीमुळे महागाई वाढण्याचा धोका अधिक गडद झाला असून सर्वसामान्य कुटुंबांच्या घरगुती बजेटवर मोठा भार पडत आहे. पुढील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारातील परिस्थिती कशी बदलते, यावर इंधन दरांचा कल अवलंबून राहणार आहे.
