दैनंदिन प्रवास, वेळ आणि खर्च वाचविणाऱ्या पर्यायी मार्गाचा नागरिकांकडून आग्रह
अंजनगाव बारी / पवन इंगोले
अमरावतीचा औद्योगिक आणि कृषी विकास देशाच्या प्रमुख समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी सुमारे ८०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी आमदार रवी राणा यांनी नुकतीच केली. अमरावती शहराला बाहेरून चक्री मार्ग मिळावा आणि समृद्धी महामार्गाशी सुरक्षित जोडणी व्हावी यासाठी हा प्रस्तावित मार्ग आकार घेत आहे.महामार्ग जोडणीसह उद्योजकता, लॉजिस्टिक पार्क, मालवाहतूक आणि जिल्ह्याचा दीर्घकालीन विकास या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रस्त्याचे आराखडे पाहण्यात आले. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेताना रवी राणा यांनी गुणात्मक कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
जोडरस्त्यावरून नागरिकांकडून पुढाकाराने मांडणी
समृद्धी महामार्गाच्या या जोडणीबाबत स्थानिक नागरिकांनीही मोकळेपणाने आपली मते व्यक्त केली असून, अनेक पर्याय समोर आले आहेत.
“अंजनगाव बारी–नांदगाव मार्गाने रस्ता गेला असता अंतर कमी पडले असते” — प्रल्हाद मुळे
प्रल्हाद मुळे यांनी जोडरस्ता नियोजनावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, विद्यमान प्रस्तावामुळे नागरिकांना 12 ते 14 किमीचा वळसा घ्यावा लागतो. अंजनगाव बारी–नांदगाव मार्गाने थेट जोडणी दिल्यास समृद्धीपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले असते, असा त्यांचा दावा.
“विकासात अंजनगाव बारीला नेहमीच अन्याय” — प्रविण इंगोले
प्रविण इंगोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की गावाला रेल्वे स्टेशन, महामार्ग व ग्रामविकासाच्या अनेक निर्णयांत वारंवार नुकसान सहन करावे लागले आहे. काहींच्या फायद्यासाठी वर्तुळाकार मार्ग आखला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“गावातून चार पदरी रस्ता गेला तर शेतीचे प्रचंड नुकसान” — बंडू डकरे
बंडू डकरे यांनी वेगळा दृष्टिकोन मांडत सांगितले की हा रस्ता अदानी, बेलोरा विमानतळ आणि मालखेड लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीसाठी निर्णायक आहे. परंतु हा मार्ग गावातून नेल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊन गावाची रचना बदलण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
“अमरावती–अंजनगाव बारी–नांदगाव विद्यमान मार्ग चार पदरी करणे हा उत्तम पर्याय” — साहेबराव राऊत
राऊत यांनी सध्याचा अमरावती–बडनेरा–अंजनगाव बारी–नांदगाव मार्ग चार पदरी करण्याची मागणी केली. यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविल्यास प्रशासन लवकरात लवकर निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी सुचवले.
*विकासाला गती, निर्णयाला सजगता आवश्यक*
समृद्धी महामार्गाशी अमरावतीची जोडणी जिल्ह्याच्या विकासाचा नवा मार्ग खुला करते आहे. मात्र या रस्त्याच्या अंमलबजावणीत लोकांची सोय, शेतीचे नुकसान, प्रवासाची बचत, आणि दीर्घकालीन नियोजन या सर्व बाबींची सांगड घालणे आवश्यक आहे.आमदार रवी राणा यांच्या पाहणीनंतर हा प्रकल्प गतीमान झाला असला, तरी अंतिम आराखड्यात नागरिकांचे सांगोपांग मत विचारात घेतले तरच हा रस्ता ‘समृद्धीचा’ खरा मार्ग ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
