मनोज गावनेर व राहुल वानखडे यांनी सर्वांच्या वतिने तक्रार व निवेदन दिले
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम करण्यात आलेल्या पळसमंडळ ते तिघारा फाटा या गावादरम्यानच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले असून संबंधित ठेकेदाराला यासंबंधी प्रशासनाने जाब विचारून भ्रष्टाचार समोर आणणे गरजेचे आहे व या झालेल्या कामावर संबंधित अधिकाऱ्याने योग्य निरिक्षण का केले नाही? किंवा यात काही साटंलोटं आहे का? असा प्रश्न या मार्गे रहदारी करणाऱ्या सर्वांनाच नक्की पडतो. रस्ता बनविण्याआधी आवश्यक असलेले कुठलेही काम न करता सहज एकाच पावसात सर्व निकृष्ट खडीकरण निघून जाईल व आता रहदारी करणारे नागरिक जीव मुठीत धरून या रस्त्याने ये जा करतात. आता या निकृष्ट रस्त्याचे बिल कुठलेही परिक्षण न करता काढल्यास हा सामान्य माणसांच्या खिश्यातील करचोरी करून केलेला भ्रष्टाचार असेल. आणि एक वर्षाच्या आत हा रस्ता आधीपेक्षा खुप जास्त खराब व धोकादायक होऊन सामान्यांच्या जीवनाशी खेळणे होईल.

म्हणून या रस्त्यामुळे कुणालाही कुठलीही इजा झाल्यास थेट प्रशासनाला व ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल व जीवितहानी हानी झाल्यास मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्व नागरिक सज्ज असणार. आता हा रस्ता खराब झाल्यावर पुन्हा रस्ता दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जाईल. हा सर्व अपव्यय, भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे व मुद्याचे निराकरण होईपर्यंत हा मुद्दा लावून धरणार असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यासंबंधी लक्ष घालून प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करावी व रस्त्याची गुणवत्ता तपासावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करून दर्जेदार रस्ता करण्याची मागणी आजुबाजूच्या खेड्यातील सर्व गावकरी व रहदारी करणारे नागरिक करित आहेत. त्यासंबंधीचे सर्वांच्या वतिने निवेदन मनोज गावनेर व राहुल वानखडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती मधील मुख्य कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अधिक्षक अभियंता, जिल्हाधिकारी व तसेच नांदगाव खंडेश्वर तहसिलदार यांना दिले आहे.
