अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. १० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणात प्रस्तावित उपवर्गीकरणाबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाने तीव्र आक्षेप नोंदविले असून, या निर्णयाबाबत सविस्तर सूचना सादर केल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन पाठविण्यात आले.महासंघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख आक्षेपांमध्ये न्या. बदर समितीचा संशोधन अहवाल अद्याप सार्वजनिक न झाल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच ५९ अनुसूचित जातीतील विविध घटकांचे प्रतिनिधित्व समितीत नसल्याने हा अहवाल एकांगी व अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय समितीने वर्गीकरणासाठी कुठले आर्थिक, सामाजिक निकष वापरले, सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयांचा आधार घेतला, तसेच कोणती गृहीतके मान्य केली याबाबत स्पष्टता नसल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे महासंघाने नमूद केले आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वांचा अवलंब न केल्याने समितीचे कामकाज न्यायसंगत नसल्याचा ठाम आरोपही करण्यात आला आहे.महासंघाने पुढे म्हटले आहे की, सध्या वापरला जाणारा इम्पिरिकल डेटा कालबाह्य झाला असून २०२७ च्या जनगणनेनंतर अद्ययावत माहितीच्या आधारेच कोणताही निर्णय घ्यावा. तसेच आक्षेप व सूचना सादर करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी अत्यंत अपुरा असल्याने तो वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.आर्थिक निकषांच्या अंमलबजावणीबाबतही महासंघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पारंपरिक व्यवसायाच्या आधारे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या घटकांवर क्रिमीलेअर अट लागू करावी की नाही, याबाबत स्पष्ट धोरण आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.महासंघाच्या निवेदनात एकल सदस्यीय समिती असंवैधानिक असून, सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाच्या अभावामुळे हा निर्णय लोकशाही व सामाजिक न्यायाच्या तत्वांना बाधक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व घटकांना प्रतिनिधित्व देऊन नव्याने सर्वसमावेशक समिती गठीत करावी व पारदर्शक, न्याय्य पद्धतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते रविंद्र राजुसकर, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पानझाडे, जिल्हा संपर्कप्रमुख पुरुषोत्तम वनस्कर, शिक्षक आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रा.गजानन वानरे, जिल्हाध्यक्ष निलेश जामठे, जिल्हा सचिव पांडुरंग गोंडेकर, जिल्हा संघटक मोहन पटके, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर कोथळकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश चापके, जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवस्कर,संजय गव्हाळे,संजय वानरे,राजकपुर डोंगरे,सिलमंतु गेडाम,वसंत पाटील,विजय सावरकर,प्रमोद इंगळे,रमन जामठे आदिसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
