अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्स या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेच्या निवासी आयुक्तपदी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची निवड झाल्याबद्दल येत्या १ मे महाराष्ट्र दिन निमित्त नागरी सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अमरावती येथील विश्राम भवन येथे होणार असून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरुणांमध्ये नेतृत्व, सांघिक कार्य आणि सेवाभावाची भावना रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेत डॉ. गवई यांची निवड त्यांच्या सामाजिक व युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरीव कार्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. ते भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तसेच सार्क स्तरावरील युवा दूत म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.हा नागरी सत्कार समारोह अखिल भारतीय आंबेडकर कलावंत परिषद आणि अमरावतीतील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व राष्ट्रीय पुरस्कार विजेते क्रांतिभूषण खडसे राहणार असून खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड्स ही स्वयंसेवी, गैर-राजकीय आणि शैक्षणिक संस्था असून तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी कार्य करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवाभाव निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ही संस्था विश्व स्वतंत्र स्काऊट फेडरेशनची सदस्य असून देशभरातील युवकांसाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविते.डॉ. गवई यांनी युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव आणि विश्वशांती यांसारख्या मूल्यांचा प्रसार करत युवक सशक्तीकरणासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या निवडीमुळे अमरावती जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले असून ही बाब स्थानिकांसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव निमकर करणार असून आभार प्रदर्शन डेटाराम मनोजा करतील. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गौतम गायकवाड यांनी केले आहे.
