अंजनगाव बारी /पवन इंगोले
अंजनगाव बारी परिसरातील साधारण १६ हजार लोकसंख्येसाठी केवळ तीन स्वस्त धान्य दुकाने उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी हालहवाल होत आहे. सध्या तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रांगा, दोन-दोन दिवस मजुरी सोडून घरी थांबणारे नागरिक आणि संथ गतीने चालणारे वितरण या समस्येमुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.धान्य दुकानांचा सकाळ-संध्याकाळ मिळून एकूण आठ तासांचा वेळ असला तरी एका दुकानातून दिवसाचा फक्त एकाच बारा ग्राहकांना धान्य मिळते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसमोर ही क्षमता अत्यंत अपुरी ठरत आहे.गावातील तीनही दुकानांमध्ये ग्राहकसंख्येत असमानता असल्याने एका दुकानावर ग्राहकांचा अनावश्यक ताण पडतो आहे. दोनच कर्मचारी एवढ्या मोठ्या संख्येला सांभाळू शकत नसल्याने ग्राहकांना लांबलचक प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांनी यासाठी दिवस-दिवस मजुरी सोडावी लागल्याने मोफत धान्य मिळण्यापेक्षा आर्थिक नुकसान जास्त होत असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि स्थानिक बैठकीतून वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने याकडे पुरेशे लक्ष दिले नसल्याची नाराजी नागरिकांत आहे. धान्य वाटपाच्या काळात प्रत्यक्ष पाहणी केल्यास समस्येची खरी व्याप्ती स्पष्ट दिसेल, असा नागरिकांचा स्पष्ट स्वर आहे.लोकसंख्येच्या तुलनेत गावात किमान चार स्वस्त धान्य दुकाने नसल्यास परिस्थिती सुधारूच शकत नाही, असा सर्वसामान्यांचा ठाम निष्कर्ष आहे. प्रत्येक दुकानात ग्राहकसंख्या समसमान करण्याची आणि पुरेसा मनुष्यबळ व वेळ उपलब्ध करण्याची तातडीची गरज असल्याचेही नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
