महावितरणचे नागरिकांना आवाहन*
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शहरातील उस्मानिया मशिदीजवळ महावितरणच्या रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. ही आग अपघाती लागली की लावण्यात आली, याबाबत स्पष्टता नसली तरी प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. महावितरण आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात यश आले.मात्र या घटनेत महावितरणच्या वीज यंत्रणेला नुकसान झाले असून परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. महावितरणचे सहाय्यक अभियंता विनायक वाडवे, वरिष्ठ तंत्रज्ञ अनुप धर्माळे, नारायण वाघ यांनी पर्यायी व्यवस्थेला गती देत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला.वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळल्यामुळे वीज यंत्रणेला गंभीर धोका निर्माण होतो.

यामुळे केवळ यंत्रणेचे नुकसान होत नाही, तर नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांनी सांगितले.शहरी आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. हा कचरा जळल्यास भूमिगत केबल्स तसेच इतर उपकरणांचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाढत्या उन्हामुळे अशा आगींचा धोका अधिक वाढला आहे.तसेच,उपरी वीजवाहिन्यांखाली कचऱ्याला आग लागल्यास तारा वितळण्याची शक्यता असून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे नागरिकांनी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीज यंत्रणेला आग लागल्याची घटना आढळल्यास तत्काळ ७८७५७६३८७३ या क्रमांकावर, तसेच १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवर किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
