मंजूर ब्लड बँक तीन वर्षांपासून बंद, औषधांचा तुटवडा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
रुग्णांना रक्त, औषधे आणि डॉक्टरांसाठी करावी लागते धावपळ
अस्वच्छ परिसर, कर्मचाऱ्यांवर आरोप आणि सुविधा असूनही रुग्णांची गैरसोय
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात विविध गंभीर समस्या उघड झाल्या असून नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेली ब्लड बँक अद्याप सुरू न झाल्यामुळे रुग्णांना रक्तासाठी तब्बल ३५ किलोमीटर अंतरावर अमरावती येथे जावे लागत आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा, लॅब साहित्याची कमतरता, डॉक्टरांची अनुपस्थिती, अस्वच्छ परिसर आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या सर्व कारणांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातील नागरिकांनी याबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ब्लड बँकेचे साहित्य धूळखात तीन वर्षांपासून काम रखडले
नांदगाव खंडेश्वर येथे ब्लड बँक मंजूर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ब्लड बँकेचे साहित्य धूळखात पडलेले आहे. यामुळे गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रक्ताची गरज भासल्यास नागरिकांना ३५ किमी दूर असलेल्या अमरावती येथे जावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत हा प्रवास रुग्णांसाठी धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.येथील ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ वेळेत हजर राहत नसल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. काहीवेळा ते रुग्णालयात आले तरी एक-दोन तास थांबून निघून जातात, असे रुग्णांचे म्हणणे आहे. संबंधित तंत्रज्ञाने शहरात स्वतःची खाजगी लॅब सुरू केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना स्वतःच्या खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाते, अशी तक्रार अनेक रुग्णांनी पत्रकारांपुढे केली. हा कर्मचारी अकोला येथून दररोज ये-जा करतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

रुग्णालयात आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा
ग्रामीण रुग्णालयात अनेक अत्यावश्यक औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. खोकल्याचे औषध, बी.पी. आणि शुगरच्या गोळ्या, रेबीज व टी.टी. इंजेक्शन, दम्याच्या गोळ्या, पोटदुखी व उलटीसाठी लागणारी इंजेक्शन्स, ॲसिडिटीवरील औषधे तसेच डिपीन एस.एम.जी. गोळ्या उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या साहित्याचाही मोठा तुटवडा आहे.या संदर्भात वारंवार मागणी करूनही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर याचा मोठा परिणाम होत आहे.
परिसर अस्वच्छ – गाजर गवताचा वाढता प्रादुर्भाव
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात गाजर गवत तसेच झाडे-झुडपांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे. परिसराची योग्य देखभाल न केल्यामुळे येथे स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
पोस्ट मॉर्टेम रूम लहान – डॉक्टर डिप्युटेशनवर
येथील पोस्ट मॉर्टेम रूम अत्यंत लहान असल्याने मृतदेहाचे परीक्षण करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथे मोठी व प्रशस्त पोस्ट मॉर्टेम रूम उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच येथे कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.याशिवाय रुग्णालयातील हाडांचे डॉक्टर सध्या अमरावती येथे डिप्युटेशनवर असल्यामुळे स्थानिक रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित डॉक्टरांचे डिप्युटेशन तात्काळ रद्द करून त्यांची नांदगाव खंडेश्वर येथे नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
डायलिसिस सेंटर सुरू; मात्र डॉक्टरांची कमतरता
रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असले तरी ते पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. कारण या केंद्रासाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरज भासल्यास अमरावती येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधून डॉक्टरांना बोलवावे लागते. या प्रक्रियेमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात विलंब होतो.डायलिसिससारख्या महत्त्वाच्या सेवेसाठी कायमस्वरूपी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
बायोमेट्रिक हजेरीला तिलांजली – आदेशांचे पालन नाही
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. येथे बायोमेट्रिक मशीनच बसवण्यात आलेले नाही.
नागरिकांची प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी
या रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या, अपुऱ्या सोयी-सुविधा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय हे रुग्णांसाठी उपचाराचे ठिकाण न राहता त्रासाचे केंद्र बनल्याची भावना तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून ब्लड बँक सुरू करणे, औषधांचा तुटवडा दूर करणे, डॉक्टरांची नियुक्ती करणे आणिरुग्णालयातील सुविधा सुधारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
