वाहतूक कोंडी वाढली; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अमरावती तालुक्यांतील अंजनगाव बारी सर्कलमधील वडगाव जिरे-मालखेड रेल्वे परिसर तसेच वाकपूर–दादापूर या महत्त्वाच्या ग्रामीण संपर्क मार्गांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि आरोग्य कर्मचारी यांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.वडगाव जिरे–मालखेड रेल्वे मार्गावरील खडीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी साधारण १ किमी डांबरीकरण अद्याप रखडले आहे. धरमखेडे शेतापासून नाल्यापर्यंतचा रस्ता खड्डेमय आणि अरुंद असून या मार्गावरून हजारो नागरिक दररोज ये-जा करतात.

स्थानिकांच्या मते, आसपासच्या चार ते पाच गावांतील वाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रस्त्यावरील दुरवस्था पाहून वाहतूक कोंडी निर्माण होते. काही ठिकाणी अतिक्रमण, तर काही ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना संथ गतीनेच प्रवास करावा लागत आहे.वाकपूर–दादापूर मार्गाची अवस्था अत्यंत गंभीरसाधारण २.५ किलोमीटरच्या वाकपूर–दादापूर जोडमार्गावर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. उन्हाळ्यात प्रचंड धूळ उडते, तर पावसाळ्यात चिखलामुळे वाहतूक जवळपास ठप्प होते.यामुळेशालेय विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत शेतमाल वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहनांना अतिरिक्त खर्च व वेळ लागतो ग्रामस्थ व कामगार वर्गाचे दैनंदिन हाल वाढले आहेत स्थानिकांनी या मार्गाला “प्रवाशांसाठी सर्वात त्रासदायक रस्ता” अशी उपमा दिली आहे.
“दररोजचा प्रवास त्रासदायक” स्थानिकांचा संताप
रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत वडगाव (जिरे) ग्रामपंचायत प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. तातडीने रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.धनश्याम दे. ब्राह्मणे, प्रशासक [सरपंच, वडगाव (जिरे)] म्हणाले, “रोजचा प्रवास आता अत्यंत त्रासदायक झाला आहे. रस्ते नीट झाले तरच दिवसातील तासांचा अपव्यय कमी होईल.”
अपघातांचे प्रमाण वाढले – नागरिकांची चिंता
वाहतुकीची कोंडी वाढल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोटारसायकली घसरून पडणे, चाकांचे नुकसान होणे, वाहने अडकणे अशा घटना सतत घडताना दिसत आहेत.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “उपाययोजना तातडीने करा” असा स्वर अधिक तीव्र झाला आहे. ]
वडगाव जिरे ग्रामस्थांची बससेवेची मागणी
वडगाव जिरे व आसपासच्या ग्रामीण परिसराला जोडणाऱ्या मार्गांवरच्या मर्यादित वाहतूक साधनांमुळे नागरिकांची अडचण वाढत चालली आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि महिलांना दररोजच्या प्रवासासाठी बससेवेचा मोठा अभाव जाणवत असून, ग्रामस्थांकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे नवीन बससेवेची मागणी होत आहे.
