गृहिणींसह हॉटेल व्यावसायिकांचे हाल;धूर-लाकूड-खर्चाचा वाढता ताण
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
ग्रामीण भागात सध्या गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे पुन्हा एकदा पारंपरिक चुली पेटवण्याची वेळ महिलांवर आली आहे. गेल्या दोन दशकांपासून अनेक घरांमध्ये बंद पडलेल्या चुली आता अडगळीतून बाहेर काढून वापरात आणल्या जात असल्याचे चित्र गावखेड्यांत दिसून येत आहे. या अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे २० ते २५ वर्षे वयोगटातील अनेक तरुण महिलांना चूल पेटवण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्याने स्वयंपाक करताना त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गॅसच्या वापरामुळे वर्षानुवर्षे बदललेल्या स्वयंपाक पद्धतीमुळे धूर सहन करणे, लाकूड गोळा करणे आणि चूल पेटवणे ही कामे पुन्हा शिकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. धुरामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास यांसारख्या आरोग्य समस्याही निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.ग्रामीण भागातील हायवेवरील हॉटेल चालकांनाही गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यावसायिकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही गोष्टींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.गॅस सिलिंडर बुकिंगसाठी फोन केल्यास अनेक वेळा संपर्क होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही वेळा संपर्क झाल्यानंतरही “तांत्रिक कारणामुळे बुकिंग होत नाही” असा संदेश मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिणामी, अनेक दिवसांपासून बुकिंग प्रलंबित राहिल्याने घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. गॅस तुटवड्यामुळे चुलीसाठी लागणारे लाकूड तसेच शेणाच्या गौऱ्यांची मागणीही वाढली आहे. मात्र हे साहित्य सहज उपलब्ध होत नसल्याने महिलांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना ते मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. वितरण व्यवस्था सक्षम करून नागरिकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध झाल्यास सध्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
