प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मध्ये सध्या घाणीचे गंभीर साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रभाग सत्ता धारी पक्षातील गटनेते व उपाध्यक्ष यांच्या कार्यक्षेत्रात येत असतानाही स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक मानले जात आहे.प्रभागातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून गटारे तुंबल्यामुळे अस्वच्छतेची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

दुर्गंधी, डासांचे प्रमाण आणि संभाव्य साथीच्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेऊन कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था उभारावी, तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागातील परिस्थितीची त्वरित दखल घेऊन जबाबदारी पार पाडावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.
