जनहितासाठी उचलले महत्वाचे पाऊल
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या नूतन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारताच जनहितार्थासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मा.मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत, नगराध्यक्षांनी आपल्या शपथविधीच्या दिवशीच म्हणजे सोमवार दिनांक ९/०२/२०२६ रोजी जनता दरबार हाच आमचा पदभार, हा जनहिताचा संदेश देऊन ‘जनता दरबार’ आयोजित करून प्रशासकीय कामाला वेग देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. नगरसेविकेच्या निवेदनाला यश नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने यांनी दिनांक ५/०२/२०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नगर पंचायत क्षेत्रात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत समस्यांबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘जनता दरबार’ भरवण्याची मागणी केली होती. प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक व्हावे आणि नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा यामागचा मुख्य उद्देश होता.शपथविधीदिनीच लोकशाहीचा उत्सव नगराध्यक्षांनी शपथविधीचा सोहळा केवळ औपचारिक न ठेवता, त्या दिवशी थेट जनतेच्या समस्या ऐकण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या प्रलंबित मागण्या आणि तक्रारी थेट प्रशासनासमोर मांडता येणार आहे. यामुळे नगर पंचायत प्रशासन आणि नांदगाव खंडेश्वर शहरातील नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला असून, प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण नगराध्यक्षांच्या या सकारात्मक भूमिकेचे आणि नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने यांच्या पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. “जनता दरबारामुळे आमचे प्रश्न आता लवकर सुटतील,” अशी आशा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
