मोठमोठे खड्डे,तुटलेल्या नाल्यांमुळे नागरिक त्रस्त
परतवाडा /फिरोज खान
परतवाडा शहरातील तारा नगर परिसरातील मुख्य रस्ता तसेच जोडरस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे आणि तुटलेल्या नाल्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दोनचाकी वाहनधारकांना दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला असून, काही नागरिक रात्रीच्या अंधारात पडून जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.तारा नगर परिसरातील मुख्य रस्ता हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून, तो अनेक उपनगरे आणि वसाहतींना जोडतो.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नगरपरिषद प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले असून, नाल्यांची झाकणे फुटलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद बांधकाम विभाग कडे तक्रारी केल्या, मात्र केवळ माती आणि खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. काही दिवसांतच ती पुन्हा उखडून रस्ता पूर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.खड्डेमय रस्त्यांमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचारी अपघातग्रस्त होत आहेत.आरोग्य व शिक्षणावर परिणाम: खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे.वाहतूक व्यवस्था विस्कळीत: काही ग्रामीण भागांमध्ये प्रवासी वाहने देखील या मार्गावरून जाण्यास टाळाटाळ करत आहेत.नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, केवळ दिखाऊ काम न करता टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीने रस्ते व नाल्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.जर त्वरित पावले उचलली नाहीत, तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
