आरोपींवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मुख्यमंत्रीांकडे मागणी
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना आता वारंवार जीव धोक्यात घालून बातमी संकलन करावे लागत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर झालेला हल्ला आणि अमरावती रेल्वे स्थानकावर पत्रकार विनोद इंगळे यांना टीसीने केलेली मारहाण, या दोन घटनांनी संपूर्ण पत्रकारिता क्षेत्र हादरले आहे.
पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात शनिवार(ता. २०) रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.नाशिकमधील घटनेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे, किरण ताजने व अभिजित सोनवणे यांच्यावर गावगुंडांनी हल्ला केला. छत्री, काठी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आल्याने हे तिन्ही पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकारितेच्या इतिहासातील ही अत्यंत धक्कादायक व निंदनीय घटना असल्याचे मानले जात आहे.दरम्यान, अमरावती रेल्वे स्थानकावर देशोन्नती या वृत्तपत्राचे पत्रकार विनोद इंगळे यांना एका टीसीने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे पत्रकार सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.या दोन्ही घटनांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला आहे. निवेदनात आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांच्या या घटना केवळ संबंधित पत्रकारांवर नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवर थेट हल्ला असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंईचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे, सुरज, दहाट, प्रा संजय शेंडे, छगन जाधव,अमर घटारे, शहराध्यक्ष विक्रम ढोके,अंकुश बनसोड, अनिकेत दहातोंडे, अर्चना रक्षे, विनोद इंगळे, नकुल नाईक, प्रवीण शर्मा, निशिकांत देशमुख, अभिजीत तिवारी, सुभाष कोटेजा, संजय मोहोळ, उज्वल भालेकर, सागर तायडे, सोमेश्वर जवळे, प्रवीण शेगोकार, विजय गायकवाड, शुभम मेश्राम, इत्यादी उपस्थित होते.
