अंजनगाव सुर्जी /मनोहर मुरकुटे
सेवा पंधरवड्यात विविध उपक्रम या मोहिमेअंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुक्यात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच तीन टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात दि. १७ ते २२ सप्टेंबर
या कालावधीत पाणंद रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग, या टप्प्यात पाणंद, शिवरस्त्यांना क्रमांक देण्याच्या महसूल विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित केले जातील. निस्तार पत्रकामध्ये नोंद नसलेल्या पाणंद रस्त्यांची नोंद घेण्याची कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेतले जातील. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील. शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात दि. २३ ते २७ सप्टेंबरमध्ये
या कालावधीत ‘सर्वांसाठी घरे’ योजनेची अंमलबजावणी केली जाईल. यात घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जेहक्काने दिल्या जातील. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप केले जातील. यामध्ये शासकीय जमिनी वाटप केलेल्या,अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे नियमित केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असेल.
तिसऱ्या टप्प्यात दि. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
या कालावधीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात जनसंवाद, १५५ अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा मोहीम आणि ‘गाव तिथे स्मशानभूमी‘ या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल.या मोहिमेत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि विविध विभागांचे अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत. नागरिकांनी या ‘सेवा पंधरवडा‘ उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आव्हान तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी केले आहे.
