
आदिवासी पारधी समाज बांधवांनी आंदोलनाचा इशारा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
मौजा मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजातील गरजू नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, ग्रामपंचायत मंगरूळ चव्हाळा येथील ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे आणि अस्पष्ट कारणांमुळे या योजनेपासून फासेपारधी समाज वंचित राहत आहे.गेल्या वर्षी ग्रामसेवकांनी शबरी अंतर्गत येणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार फासेपारधी समाजातील अनेकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले.
मात्र, ग्रामसेवकांनी कोणतेही ठोस कारण न देता अर्जदारांना वेळोवेळी परत पाठवले. त्यामुळे या गरजू समाज घटकाला अद्यापही हक्काचे घर मिळू शकलेले नाही.फासेपारधी वस्तीमध्ये आजही अनेक कुटुंबे पडझड झालेल्या घरांमध्ये राहत असून काहीजण इतरांच्या घरी आसरा घेऊन राहतात. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरले असल्याचे समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे.याशिवाय, पारधी वस्तीतील विद्युत खांबे धोकादायक अवस्थेत आहेत. अनेक खांबांमध्ये तडे गेले असून कोणत्याही क्षणी हे खांब कोसळण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत व वीज वितरण कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, संभाव्य जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे.तसेच, पारधी वस्तीमध्ये पायाभूत सुविधा अत्यंत निकृष्ठ अवस्थेत आहेत. अद्याप काँक्रिटचे रस्ते, नाल्या किंवा योग्य ड्रेनेज व्यवस्था नाही. पावसाळ्यात नाल्यांचे पाणी घरात शिरते. मागील वर्षी अशाच परिस्थितीत दोन लहान मुले वाहून जाण्याच्या प्रसंगातून निसटली होती. नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा निवेदने दिली असली, तरीही प्रशासनाचे लक्ष वेधले गेलेले नाही.फासेपारधी समाजाने यावेळी ठणकावून सांगितले आहे की, जर प्रशासनाने तातडीने घरकुल योजना लागू करून, वस्तीतील विद्युत खांबांची दुरुस्ती व नाल्यांचे काँक्रिटिकरण केले नाही, तर समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे आदिवासी पारधी समाजातील अश्विन भोसले, नरेंद्र पवार, अविनाश भोसले, ललिता भोसले, रवी पवार, मनोज भोसले, उंची भोसले, इंचा भोसले, सचचुन पवार, नजेशा भोसले आदींनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.