बेसन भाकर आणून फडणवीस सरकारचा निषेध
माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केले नेतृत्व
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांची फसव्या घोषणा करून क्रूर थट्टा करणाऱ्या फडणवीस सरकारविरुद्ध नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. *प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात* तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालयासमोर बेसन भाकर आणून निषेध व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून पिकाचे नुकसान झाले, त्याचे केवळ पंचनामे झाले. त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने कोरडा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णतः कोलमडून गेला आहे. परंतु शासन शेतकऱ्यांचे मायबाप असताना मीडियात हेडलाईनसाठी फडणवीस सरकार शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून केवळ मदतीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करीत आहे.

दिवाळी आली असताना शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप मदत पडलेली नाही.मागील वर्षीची पिकविमा घोषणा, सरसकट दोन लाखाची कर्जमाफी घोषणा व त्याच्या जाहिराती, यावर्षी अतिवृष्टीने जमीन खरडून पिके नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फक्त पंचनामे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची घोषणा. वरील घोषणांप्रमाणे किती शेतकऱ्यांना मदत मिळाली? दिवाळीला ५००० देण्याची घोषणा, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारी बाब आहे. तीही मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णतः अंधारात असून फडणवीस सरकार निर्लज्जपणे, अमानुषपणे शेतकऱ्यांशी वागत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.या काळ्या दिवाळीची गांभीर्याने दखल घेऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा, कर्जमाफी, भरीव नुकसान भरपाई, प्रोत्साहन अनुदान चा विनाअटी शर्तीने तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, परीक्षित जगताप, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, समीर पाटील, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदगाव खंडेश्वर, अमोल होले, पंकजा वानखडे, अमोल धवसे, निशांत जाधव, सुनील शिरभाते, सर्फराज खान, विनोद चौधरी, बाळासाहेब इंगळे, श्रीकांत गावंडे, गणेश आरेकर, विनोद जगताप, ओमप्रकाश सावळे, राजु सरोदे, दिपक सवई,दिपक भगत,प्रविण मोखळे, सुनील इंझळकर, प्रकाश इंझळकर, सुधीर पाटेकर, श्रीनिवास सुर्यवंशी, मोरेश्वर डिवटे, गजानन भडके, ज्योतिराव चवरे,प्रशांत ठाकरे, मनिष जगणे, प्रसाद भगत, संजय कुंभलकर, राहुल गुल्हाने, उमेश दहातोंडे, शिवाजी चव्हाण, हकिम भाई,प्रमोद उगले संचालक गौतम सोनवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुशील थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश ठाकरे यांनी केले.
