रक्तदान व सामाजिक सेवेत निस्वार्थ योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल.
मिथिला, दरभंगा बिहार येथे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन गौरव
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मिथिला, दरभंगा (बिहार) येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात रक्तदान व सामाजिक सेवेत निस्वार्थपणे कार्य करणारे योगेश सुरेश घोडे यांचा राष्ट्रीय सन्मानाने गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोशल ॲक्टिव्हिटी वेल्फेअर असोसिएशन (सवाब), नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दरभंगा, बिहार येथील तारा मंडळ मिथिला येथे आयोजित कार्यक्रमात सोशल ॲक्टिव्हिटी वेल्फेअर असोसिएशनचे (सवाब) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक महथा यांच्या हस्ते योगेश सुरेश घोडे यांना ‘रक्तवीर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
योगेश घोडे यांनी आतापर्यंत सात वेळा पूर्ण रक्तदान करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देण्यासाठी ते पुढाकार घेत असतात. कोणताही मोबदला किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजहिताच्या भावनेतून ते आपले कार्य सुरू ठेवत आहेत.
रक्तदान हे केवळ एका व्यक्तीचे प्राण वाचविण्याचे माध्यम नसून समाजामध्ये माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणारे कार्य आहे. याच भावनेतून योगेश घोडे यांनी रक्तदानासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने घेतलेली दखल ही त्यांच्या सेवाभावी कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
मिथिला, दरभंगा बिहार येथे महाराष्ट्र संस्कृतीच्या पोशाखात झालेला हा सन्मान योगेश घोडे यांच्यासाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरला. महाराष्ट्रातून बिहारपर्यंत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
योगेश सुरेश घोडे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
