जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा; तिसऱ्या देशी दारू दुकानाला तीव्र विरोध
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत हद्दीत देशी दारूच्या तिसऱ्या दुकानासाठी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील महिला व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांचा एल्गार उभारण्याची तयारी सुरू झाली असून, नागरिकांच्या हिताचा विचार करून तिसऱ्या दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.
एकीकडे बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या गंभीर बनलेल्या असताना दुसरीकडे दारूची दुकाने वाढविण्याची गरज काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दारूचे दुकान हा केवळ व्यवसायाचा विषय नसून त्याचा परिणाम कुटुंबव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, मुलांचे शिक्षण आणि युवकांच्या भवितव्यावर होऊ शकतो, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
“आम्हाला विकास हवा, विनाश नको!” असा निर्धार व्यक्त करत महिलांनी दारू दुकानाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात आधीच दोन देशी दारूची दुकाने असताना आणखी एका दुकानाची आवश्यकता काय, असा प्रश्नही जनवादी महिला संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित करण्यात आला. निवेदन देतेवेळी महिला संघटनेच्या जिल्हा कोषाध्यक्ष प्रांजली शिंदे, आसमा परवीन, शशिकला घोडाम, अलकाबाई सुने, अर्चना उईके, माधुरी वट्ठी, कविता मसराम, तेजस्विनी शिंदे, कांचन शिंदे, मोनाली शिंदे, जयश्री शिंदे, पूजा शिंदे आदींचा सहभाग होता.
………………………………………
नांदगाव शहरात कुठलाही रोजगार नाही आमची विनंती आहे की प्रशासनाने रोजगाराकडे गंभीरतेने लक्ष केंद्रित करावं नांदगाव शहरात वाढलेल्या अवैद्य दारू व्यवसाय विरोधात महिलांची एकजूट करून तीव्र आंदोलन जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वामध्ये आम्ही उभा करणार
प्रांजली शिंदे, ज. म. स जिल्हा कोषाध्यक्ष, नांदगाव खंडेश्वर
