मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्या पाठपुराव्याला यश.
सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. शहरात मलनिःसारण प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यासाठी मौजा मुंड झुंझारराव मधील १ हेक्टर (सुमारे २.४७ एकर) शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटीपीसाठी जागा उपलब्ध होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेने ४ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत आदेश जारी केला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी एसटीपीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी त्यांनी संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधत सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रक्रियेत नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक प्रीतम सोनटक्के यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, विविध विभागांचे अभिप्राय घेणे आणि प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे काम त्यांनी केले. सहायक संचालक, नगर रचना विभाग, अमरावती यांनीही प्रस्तावित जागा एसटीपीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत अनुकूल अभिप्राय दिला आहे.

शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यापूर्वी आवश्यक बाबींची खातरजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारि आशिष येरेकर यांनी नगर पंचायतीला दिलेल्या आदेशात दिले आहेत. प्रस्तावित जागेचा नकाशा, क्षेत्रफळ, प्रवेशमार्ग, आवश्यक सुविधा तसेच संबंधित विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. जागेवर

नाला, नदी अथवा तलाव असल्यास त्याची वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
एसटीपीमुळे सांडपाणी व्यवस्थापनाला चालना.
नांदगाव खंडेश्वर शहराचा वाढता विस्तार आणि सांडपाण्याचे वाढते प्रमाण पाहता एसटीपीची उभारणी अत्यावश्यक झाली होती. जागेअभावी रखडलेला हा प्रश्न आता शासकीय जमीन मंजूर झाल्याने पुढील टप्प्यात पोहोचला आहे. एसटीपीची उभारणी झाल्यानंतर शहरातील सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे.जागा मंजुरीचा टप्पा पूर्ण झाल्याने आता एसटीपीच्या उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला चालना मिळून सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
