नेमाडे गुरुजींकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सावंगा विठोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री विठोबा संस्थान, सावंगा विठोबाचे अध्यक्ष पुंजाराम वै. नेमाडे (गुरुजी) यांच्या वतीने बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, अभ्यासाकडे त्यांचे अधिक लक्ष लागावे तसेच परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नेमाडे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळाली.यावेळी प्रशासक सरपंच बंडू भोजने,संजय मेंढे गावातील ईतर पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
