राष्ट्रीय पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदारीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
तिवसा / तालुका प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ने महाराष्ट्रातील महिला संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्ती केली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी वितोंडे यांची पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मेघालयचे मुख्यमंत्री तथा नॅशनल पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमितदादा वेळुकर (पाटील) यांच्या उपस्थितीत अश्विनी वितोंडे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाला प्राधान्य
नियुक्तीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अश्विनी वितोंडे म्हणाल्या की, पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यातील महिलांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणे, महिला कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणे आणि गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून महिलांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणे, तसेच पक्षाचे विचार व संघटनात्मक ध्येय-धोरणे महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव
अश्विनी वितोंडे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या ‘अक्षर मानव’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.संघटनेत त्यांनी तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हाध्यक्ष, राज्य संचालक तसेच राज्य महिला विभाग आणि राज्य कुटुंब विभाग प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन तसेच राज्यातील अनेक भागांत प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांनी संघटनात्मक कामाचा अनुभव मिळविला आहे.त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून नॅशनल पीपल्स पार्टीने त्यांच्यावर महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तिवसा येथे नियुक्तीपत्र प्रदान
२२ सप्टेंबर २०२६ रोजी तिवसा येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अमितदादा वेळुकर पाटील आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अश्विनी वितोंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी प्रमोद इंगळे, अमर हरले, निलेश गाडेकर, योगेश सूर्यवंशी, तसेच पत्रकार हेमंतभाऊ पखाले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अश्विनी वितोंडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय जबाबदारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अश्विनी वितोंडे यांच्या नियुक्तीमुळे नॅशनल पीपल्स पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत सामाजिक क्षेत्रात काम करत त्यांनी राज्यस्तरावर जबाबदारी मिळविल्याने तिवसा-मोझरी परिसरासह अमरावती जिल्ह्यातही त्यांच्या नियुक्तीची चर्चा होत आहे.आगामी काळात महाराष्ट्रातील महिला संघटन मजबूत करण्यासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्या कोणत्या पद्धतीने काम करतात, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
