मुख्याधिकारी निवृत्ती भालकर व आरोग्य निरीक्षक प्रितम सोनटके यांच्या अथक पाठपुराव्याला मोठे यश
बच्छरापूर येथील जमिनीचा मार्ग मोकळा; नागरिकांकडून प्रशासनाचे आभार
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित असलेला नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) प्रकल्पाचा जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मौजा बच्छरापूर येथील गट क्रमांक १३ मधील ५.२५ हेक्टर आर क्षेत्रापैकी २.०० हेक्टर आर ई-क्लास जमीन या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यास अमरावतीचे जिल्हाधिकारी यांनी एका ऐतिहासिक आदेशान्वये मंजुरी दिली आहे
.
दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, यामुळे शहराच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक विकासाला मोठी गती मिळणार आहे.कायदेशीर तरतुदींनुसार मंजुरी हा जमीन वाटपाचा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २०, ३१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३, ६ (३) (ब), ४१ आणि ५१ मधील कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन अत्यंत पारदर्शकपणे घेण्यात आला आहे.

या मंजुरीमुळे शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.’या’ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ११ वर्षांचा प्रश्न सुटला हा विषय गेल्या एका दशकाहून अधिक काळ विविध प्रशासकीय स्तरांवर प्रलंबित होता. मात्र, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा केला. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, आरोग्य व स्वच्छता (घनकचरा) निरीक्षक प्रितम न. सोनटके यांनी सर्व कायदेशीर व तांत्रिक कागदपत्रांची अचूक जुळवाजुळव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अविरत पाठपुरावा केला.नगर पंचायतच्या संपूर्ण कर्मचारी वर्गानेही या कामी मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण टीमच्या अहोरात्र मेहनतीमुळेच हा ११ वर्षांचा गुंता सुटू शकला आहे.सर्वस्तरातून कौतुक आणि अभिनंदनहा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्याधिकारी निवृत्ती भालकर आरोग्य निरीक्षक प्रितम सोनटके आणि संपूर्ण नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे नांदगाव खंडेश्वर शहरातील सुज्ञ नागरिकांकडून मनःपूर्वक आभार मानले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात नांदगाव खंडेश्वर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी होण्यास मदत होणार आहे.
