जळू गावातील स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्याची मागणी.
ग्रामस्थांच्या अडचणी दूर करून स्वच्छता, जागेची सपाटीकरण व वृक्षारोपण करण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
तालुक्यातील जळू या गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडाझुडपांची वाढ झाली असून, या परिसराची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक/सचिव यांच्याकडे गावातील नागरिक राहुल अशोकराव भाकरे यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली असता शाळेतील काही समस्या निदर्शनास आल्या. तसेच मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे काही समस्या सांगण्यात आल्या असून, त्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळा परिसरात स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जळू या गावातील स्मशानभूमी परिसरातही मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्मशानभूमीच्या परिसराची तातडीने साफसफाई करून वाढलेले गवत व झाडाझुडपे हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच स्मशानभूमीची जागा सपाट करण्याची मागणी करण्यात आली असून स्मशानभूमी परिसरातील जागा व्यवस्थित करून आवश्यक ठिकाणी सपाटीकरण करण्यात यावे. तसेच परिसराची स्वच्छता करून भविष्यातही नियमित साफसफाईची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. स्वच्छ व व्यवस्थित स्मशानभूमी परिसरामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.यासोबतच स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. परिसरात योग्य ठिकाणी झाडे लावल्यास भविष्यात परिसराचे सुशोभीकरण होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गावातील जिल्हा परिषद शाळा आणि स्मशानभूमी या दोन्ही ठिकाणच्या समस्यांकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे राहुल अशोकराव भाकरे यांनी केली आहे.
