तिन्ही विभागांच्या पथकाकडून पाहणी
कवठाळ परिसरात तूर व सोयाबीनचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी
मोर्शी/ तालुका प्रतिनिधी
मौजा कवठाळ येथील शेत सर्वे क्रमांक ३८ मध्ये परिमल रवींद्र कोहळे, तेजस रवींद्र कोहळे व रेखा रवींद्र कोहळे यांच्या शेतातील तूर व सोयाबीन पिकांचे जंगली प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदाजे पाच एकर क्षेत्रातील पिकांपैकी सुमारे पावणे दोन एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामध्ये तुरीचे जवळपास १०० टक्के, तर सोयाबीनचे सुमारे १५ टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली असून, तक्रारीची शहानिशा करण्यासाठी संबंधित विभागाच्या पथकाने दुसऱ्यांदा शेताची पाहणी केली. यावेळी वनविभागाचे दोन कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. पाहणीच्या वेळी संबंधित शेतकरी तसेच शेतात काम करणारे मजूर उपस्थित होते.सदर भागात नरभक्षक वाघिणीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची राखण करणे शक्य झाले नाही. परिणामी, शेतात जंगली प्राण्यांचा वावर वाढून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे संबंधित शेताला सोलर झटका मशीनचे कुंपण असतानाही जंगली प्राण्यांचा त्रास कमी झालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जंगली प्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले असून, पिकांचे संरक्षण करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

काही दिवसांपूर्वी वर्धा नदीकाठच्या निंभार्णि, शिवरा, राजूरवाडी, तुळजापूर, कवठाळ, भांबोरा आदी परिसरात नरभक्षक वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भीती वाटत होती. या काळात शेतात नियमितपणे राखण करता न आल्याने जंगली प्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, संबंधित विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर नुकसानीचा पंचनामा व अहवालाच्या आधारे शेतकऱ्याला नियमानुसार नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जंगली प्राण्यांचा उपद्रव, वाघाच्या भीतीमुळे शेतात जाता न येणे आणि त्यातून झालेल्या पिकांच्या नुकसानीचा साकल्याने विचार करून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांनी केली आहे.
