नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांची १५ मुद्द्यांची तक्रार; तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या प्रशासकीय अनियमितता आणि भ्रष्टाचाराची आता सखोल चौकशी होणार आहे. नगरपंचायतीचे नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या १५ मुद्द्यांच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात नगर विकास शाखेने मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने स्पष्टीकरण आणि अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक ब्राम्हणवाडे यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत आणि चुकीच्या कामांबाबत अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीत भ्रष्टाचाराबाबत तब्बल १५ गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यावर कारवाई करत, १७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून, तक्रारीच्या सर्व मुद्द्यांवर स्वयंस्पष्ट अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याची तंबी दिली आहे.
❝ सदर प्रकरणी नमूद १५ मुद्द्यांच्या अनुषंगाने आपला स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह आवश्यक कागदपत्रांसहीत तात्काळ या कार्यालयास न चुकता सादर करावे. सदर कामी अनियमितता व दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. ❞
– मीना ठाकरे
जिल्हा सह आयुक्त, नगर विकास शाखा, अमरावती
नेमके काय आहेत आदेश ?
नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे यांनी केलेल्या १५ मुद्द्यांच्या तक्रारीवर मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ खुलासा करावा.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला विनाविलंब सादर करावा.
सदर अहवालाची एक प्रत स्वतःच्या स्तरावरून तक्रारदार नगरसेवक ब्राम्हणवाडे यांनाही देण्यात यावी.
या चौकशी प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई किंवा प्रशासकीय अनियमितता खपवून घेतली जाणार नाही.
नगरपंचायतीच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्याच कारभारावर खुद्द नगरसेवकाने थेट पुराव्यांनिशी बोट ठेवल्याने आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून चौकशीचे आदेश धडकल्याने नांदगाव खंडेश्वरच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. २४ सप्टेंबरला हे चौकशीचे पत्र नगरपंचायत कार्यालयात प्राप्त झाले असून (आवक क्र. १२३७), आता मुख्याधिकारी या १५ मुद्द्यांवर काय उत्तर देतात आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
