पुढील तारीख लवकरच जाहीर होणार; ३ ऑक्टोबरचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला”
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
धर्मादाय कार्यालय, अमरावती व महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ‘विश्वस्त महापरिषद २०२६’ तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, परिषदेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, अमरावती विभागाच्या वतीने यासंदर्भात महाराष्ट्र देवस्थान समितीला अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या पत्रानुसार, मा. निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार अमरावती जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विश्वस्त महापरिषदेकडे आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून पाहता सदर कार्यक्रमाचे आयोजन करणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सदर कार्यक्रमास सहभागी होऊ शकणार नाही, असेही अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित स्वरूपात परिषद घेणे शक्य नसल्याने कार्यक्रमाला तूर्तास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.

राज्यभरातील मंदिर विश्वस्तांचा होणार होता सहभाग
धर्मादाय कार्यालय, अमरावती व महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या विश्वस्त महापरिषदेला राज्यातील विविध मंदिर संस्था व देवस्थानांचे विश्वस्त उपस्थित राहणार होते. मंदिरांचे संरक्षण व संवर्धन, देवस्थानांचे व्यवस्थापन, विश्वस्तांच्या प्रशासकीय व कायदेशीर अडचणी, मंदिरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच राज्यातील मंदिर विश्वस्तांमध्ये समन्वय आणि संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.अमरावती जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध देवस्थान संस्थांच्या प्रतिनिधींसाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात होती. मात्र, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
पुढील तारीख लवकरच जाहीर होणार
धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित विश्वस्त महापरिषद २०२६ तूर्तास स्थगित करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे नियोजित दिवशी ही परिषद होणार नसून, आचारसंहिता संपल्यानंतर कार्यक्रमाच्या नव्या तारखेबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.विश्वस्त महापरिषदेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्याबाबत संबंधित मंदिर संस्था, विश्वस्त व निमंत्रितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
आचारसंहितेमुळे ३ ऑक्टोबरची मंदिर विश्वस्त परिषद रद्द आचारसंहितेनंतर राज्यव्यापी भव्य परिषद घेणार – कैलाश कुमार पनपालिया
3 ऑक्टोंबर चे परिषदे करिता विश्वस्तांमध्ये फार मोठा उत्साह होता, आचारसंहितेमुळे धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निर्देशाप्रमाणे तांत्रिक कारणामुळे ही परिषद होऊ शकली नाही , सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमस्व आहे, विश्वस्तांचे संघटन व्याप्त स्वरूपात झाले आणि आचारसंहितेनंतर लवकरच एक फार मोठी राज्यव्यापी परिषद निश्चितच घेऊ आणि विश्वस्तांना अपेक्षित सर्व मार्गदर्शन त्या परिषदेमध्ये दिले जाईल.
