पंचायत समिती व तालुका आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम;
अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक निरोगी व्यक्तीने स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, या उद्देशाने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रक्तदान शिबिर व विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ. स्नेहल शेलार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी प्राजक्ता रमेश वानखडे यांनी रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देऊन अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले.

या रक्तदान शिबिरासाठी जिल्हास्तरीय जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून त्यांना रक्तदानाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रक्तदान
शिबिरासोबतच आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते. विशेषतः सफाई कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देत त्यांच्यासाठी ‘मित्र सुरक्षा आणि सन्मान’ अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. विविध आरोग्य तपासण्या करून संबंधितांना आवश्यक आहार, आरोग्यविषयक काळजी व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर रेवती डवरे, डॉक्टर शुभांगी खैरकर, डॉक्टर प्रज्ञा जाधव व डॉक्टर स्नेहल धवने यांनी सेवा दिली. तसेच आरोग्य सेविका श्रीमती इंगोले, श्रीमती उघडे, श्रीमती खुरपे, श्री कातोरे, आरोग्य सेवक श्री रेहान आदींनी तपासणी व आरोग्य मार्गदर्शनामध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांख्यिकी अधिकारी निलेश ठाकरे, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती कमल ध्रुवे तसेच पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तालुका लेखापाल आनंद कोरांन्ने, आरोग्य सेवक सुरेश बारबुद्धे, रक्तदाते शरद अंबाळकर, कुष्ठरोग तंत्रज्ञ भरत गाठेकर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक योगेश मुकदम, तालुका कार्यक्रम सहाय्यक अभिजीत वडनेरकर, तालुका समूह संघटक रीना इंगळे, परिचर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वेच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्य तपासणीच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि सेवाभाव या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले.
