• प्रमोद पोकळे यांचे शासनाला निवेदन
• राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
स्वच्छता, आरोग्य, ग्रामविकास, अध्यात्म, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती व देशपातळीवर विविध विधायक उपक्रम राबवून देशावर आलेल्या संकटात धावून जाऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवेत अमूल्य योगदान देणाऱ्या व स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन अनेक तरुणांना मार्गदर्शन करून त्यांच्यात खंजरी भजनांच्या माध्यमातून ऊर्जा व स्फूर्ती भरणाऱ्या राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाच पाहिजे, अशी मागणी कलावंत व साहित्यिक आधार संघ, अमरावतीचे समन्वयक तथा दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

“या भारतात बंधुभाव नित्य वसु दे” अशी उदात्त कामना ठेवून व “गाव हा विश्वाचा नकाशा” यांवर अढळ विश्वास ठेवून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याची गावोगावी ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन, जातील सलोखा, श्रमप्रतिष्ठा, धर्मसमन्वय, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरांचे उच्चाटन व सामाजिक एकतेसाठी दिलेल्या संदेशाची दखल घेत अखिल भारत साधुसमाज, भारत-चीन व भारत-पाक युद्ध तसेच कोयना भूकंपवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रीय योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने अधिक वाट न पाहता ‘भारतरत्न‘ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा, अशी मागणी करतांनाच देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही ‘भारतरत्न’ बाबत मागणी करण्यात आलेली होती. त्यामुळे आज जवळपास २५ वर्षांपासूनच्या या मागणीला केंद्र सरकारने विनाविलंब होकार द्यावा, अशी मागणी या लेखी निवेदनातून कलावंत व साहित्यिक आधार संघ, अमरावतीचे समन्वयक प्रमोद पोकळे गुरुजी यांनी केली आहे.

सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळालाच पाहिजे, यासाठी गुरुकुंजात सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबाही दिला आहे. यावेळी रवींद्र बन, भोलेश्वर मुदगल, प्रकाश वानखडे, राजेंद्र इंगोले, योगीराज राघोर्ते, प्रदीप गवळीकर, मनोज विंचूरकर, सुभाष सुने, दिनकर कांडलकर, विजय दारोकर, शिवाजी उंबरकर, नंदू पाटील, दीपक कोष्टी, अनिल गवारे, सुभाष भारती व संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.
