अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पावन भूमीला लाभलेल्या महान संतांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. त्यांनी विसाव्या शतकात भक्तीला राष्ट्रभक्तीची आणि कर्मयोगाची जोड दिली. केवळ मंदिरापुरती मर्यादित राहिलेली भक्ती त्यांनी ‘ग्रामोद्धार’ आणि ‘लोकसेवे’च्या रूपात घराघरात पोहोचवली. म्हणूनच त्यांना जनतेने आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आदराने ‘राष्ट्रसंत‘ ही पदवी बहाल केली.
३० ऑक्टोबर : ऐतिहासिक मौन श्रद्धांजली दिवस
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी गुरुकुंज आश्रम, मोझरी (अमरावती) येथे मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या संपूर्ण महोत्सवाचा केंद्रबिंदू आणि सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे ३० ऑक्टोबर रोजी पाळली जाणारी ‘ऐतिहासिक मौन श्रद्धांजली’ होय.या दिवशी देशभरातून आलेले लाखो गुरुदेव भक्त एकाच वेळी, एकाच क्षणी पूर्णपणे मौन धारण करतात. अवघ्या काही मिनिटांच्या या सामूहिक मौनामध्ये संपूर्ण परिसरात एक विलक्षण शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. हे मौन केवळ शांत बसणे नसून, राष्ट्रसंतांनी दिलेल्या ‘विश्वबंधुत्व’, ‘स्वच्छता‘ आणि ‘मानवता’ या विचारांचे आत्मपरीक्षण करणे आणि ते जीवनात उतरवण्याचा संकल्प करणे होय. या दिवशी लाखो कंठांमधून निघणारा शांततेचा सूर मानवकल्याणाचा संदेश देतो.
खंजिरी भजन आणि राष्ट्रभक्तीची हाक
तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम होते. त्यांच्या खंजिरीच्या तालावर लाखो लोक मंत्रमुग्ध व्हायचे. १९४२ च्या ‘भारत छोडो‘ आंदोलनात त्यांनी आपल्या भजनांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. “हर देश में तू, हर भेष में तू…” यांसारख्या भजनांनी तरुणांमध्ये अभूतपूर्व ऊर्जा भरली.
‘ग्रामगीता’ : मानवकल्याणाचा महान ग्रंथ
तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाचा विकास हाच देशाचा खरा विकास मानला. त्यांनी लिहिलेला ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ आजच्या काळातील मानवासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. ग्रामगीतेमध्ये त्यांनी गावाला सुसंस्कृत, स्वावलंबी आणि स्वच्छ कसे बनवावे, याचे अत्यंत साधे मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी ग्रामगीतेत लिहिले आहे:
“गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरून देशाची परीक्षा।
गावची भंगता दशा। देशही भंगून जाईल॥”
सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सुधारणा
तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने आधुनिक काळातील समाजसुधारक होते. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध तीव्र लढा दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने’ सामाजिक समता, श्रमदान, आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मोठे कार्य केले. १९५५ मध्ये जपान येथे झालेल्या ‘जागतिक धर्म परिषदेत’ त्यांनी ‘विश्वबंधुत्वाचा’ संदेश दिला.
आजच्या काळातील प्रासंगिकता
११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महानिर्वाण घेतले. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेली शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. ३० ऑक्टोबरचा हा मौन श्रद्धांजली दिवस आपल्याला याच विचारांची आठवण करून देतो. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपले गाव, समाज आणि देश स्वच्छ, सुंदर आणि एकसंध बनवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
“जय गुरुदेव!”
—–स्मिता ठाकरे,अमरावती
