ग्रामीण भागातील मंदिरांच्या विविध समस्यावर चर्चा.
मंदिर विश्वस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मंदिरांच्या विविध समस्या, मंदिरांचे संवर्धन, विकासकामे तसेच मंदिर विश्वस्तांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. येथील खंडेश्वर संस्थानच्या सभागृहात आयोजित या बैठकीला तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. ग्रामीण भागातील मंदिरांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मंदिरांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत पिसोळकर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनुप जयस्वाल प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप गर्गे आणि सचिन वैद्य,उपस्थित होते. बैठकीत मंदिरांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक प्राचीन व जागृत देवस्थानांना ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून, या मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये पायाभूत सुविधा, देखभाल-दुरुस्ती, परिसराचा विकास भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा तसेच विकासकामे करताना उद्भवणाऱ्या प्रशासकीय अडचणी यांसारख्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.मंदिरांच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधणे, आवश्यक प्रस्ताव सादर करणे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली.अनेकदा ग्रामीण भागातील मंदिरांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने विकासकामांना अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत मंदिर विश्वस्तांनी एकत्र येऊन आपल्या समस्या संघटितपणे मांडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि शासनस्तरावर त्यांची दखल घेतली जावी,यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.मंदिरांचे धार्मिक स्वरूप जपण्याबरोबरच त्यांची ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक योगदान टिकवून ठेवणे आवश्यक आहे. मंदिरांच्या विकासासाठी विश्वस्तांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, उपलब्ध शासकीय योजनांची माहिती घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत,असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मंदिर विश्वस्तांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या.

या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परस्पर समन्वय, संघटनात्मक एकजूट आणि शासनाशी सातत्यपूर्ण संपर्क महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील मंदिरांच्या विकासाला चालना मिळावी, विश्वस्तांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि धार्मिक स्थळांचे योग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने अशा बैठका उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या बैठकीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंदिरांच्या विविध प्रश्नांना एकत्रितपणे वाचा फोडण्याची संधी उपलब्ध झाली. मंदिरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून पुढील काळातही प्रयत्न करण्यात येणार असल्याने तालुक्यातील मंदिर विश्वस्तांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंदिरांची विश्वस्त सर्वश्री सचिन रिठे,उत्तम ब्राम्हणवाडे, वसंतराव कडू,वासुदेव लोखंडे, ज्ञानेश्वर आमडारे, सुभाष देवतळे,नितीन सावदे, श्याम पाठक, अमोल पोहेकर, नितीन सावदे, राजकुमार पाटेकर, विलास जाधव,गजानन कठाले, दिगंबर देवतळे, प्रकाश उठबगले,इत्यादी उपस्थित होते.
