अमरावती शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात.
ग्रामीण भागातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष.
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रा. शेलोकर प्रवीण कौसल्याबाई परशराम यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या कृती समितीचे ते अमरावती विभागीय अध्यक्ष आहेत.
अमरावती विभागातील अंशतः अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध समस्या, सेवा-सुरक्षेचे प्रश्न, वेतन व अनुदानाशी संबंधित मागण्या, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तसेच ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांमधील अडचणी यासाठी प्रा. शेलोकर यांनी सातत्याने आवाज उठविला असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत थेट मांडण्यासाठी त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत आवाज देण्याचा निर्धार
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शिक्षकांना अनेक प्रशासकीय व सेवाविषयक अडचणींचा सामना करावा लागतो. अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने, निवेदने व संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करणाऱ्या प्रा. शेलोकर यांनी आता विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या भागातील शिक्षक मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघाची अंतिम मतदार यादीही प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
“शिक्षकांचा प्रश्न हा केवळ एका संस्थेचा नाही”
अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ संस्थानिहाय समस्या म्हणून न पाहता, शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित व्यापक प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे प्रा. शेलोकर यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या प्रश्नांना शासनदरबारी मांडणे, हा आपल्या उमेदवारीमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षकांच्या हक्कांसाठी संघर्षाची भूमिका
अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न, विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या, अनुदानाचा प्रश्न, सेवा-सातत्य, वेतनातील अडचणी, शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय समस्या आणि ग्रामीण भागातील शाळांच्या विविध अडचणी या मुद्द्यांवर निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षकांसमोर भूमिका मांडण्यात येणार आहे.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची २०२६ ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, मतदान २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षकांच्या विविध संघटना, उमेदवार आणि त्यांच्या भूमिका याकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.“अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार असून, ग्रामीण भागातील तळागाळातील शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे,” अशी भूमिका प्रा. शेलोकर प्रवीण यांनी व्यक्त केली.अमरावती विभागातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा बुलंद आवाज म्हणून प्रा. शेलोकर प्रवीण यांच्या उमेदवारीकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.
