६ जुलैला ‘राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण दिवस’ घोषित करण्याची मागणी
प्रज्ञाचक्षु GLOBAL WISDOM FORUM च्या प्रस्तावाला अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा भक्कम पाठिंबा
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
विदर्भाच्या संतपरंपरेतील विलक्षण महापुरुष, प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज यांची जयंती ६ जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय दिव्यांग दिवस’ अथवा ‘राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण दिवस’ म्हणून केंद्र शासनामार्फत देशभर साजरा करण्यात यावा, या महत्त्वपूर्ण आणि अभिनव मागणीचा प्रस्ताव वारकरी शिक्षण संस्था, तिर्थक्षेत्र बेलोरा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती यांच्या माध्यमातून प्रज्ञाचक्षु GLOBAL WISDOM FORUM अंतर्गत केंद्र शासनाकडे सर्वसंमतीने सादर करण्यात आला आहे. प्रज्ञाचक्षु असूनही संत गुलाबराव महाराजांनी आपल्या अल्पायुष्यात विपुल साहित्यनिर्मिती करून अध्यात्म, भक्ती, वेदांत, धर्मसमन्वय, सामाजिक प्रबोधन, वैचारिक जागृती आणि मानवतावादी विचारांची प्रभावी मांडणी केली. त्यांच्या कार्यातून दिव्यांगत्व हे मर्यादा नसून ज्ञान, चिंतन आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याची शक्ती ठरू शकते, हा प्रेरणादायी संदेश समाजासमोर आला आहे. याच व्यापक विचारातून “६ जुलै” हा दिवस देशातील दिव्यांग बांधवांच्या सन्मानाचा, आत्मविश्वासाचा, स्वाभिमानाचा आणि सशक्तीकरणाचा दिवस म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा व्हावा, अशी संकल्पना संस्थेने पुढे आणली आहे. या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच दिव्यांग कल्याण मंत्री मा. श्री. अतुल सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत या विषयावर विस्तृत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ साहेब यांच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर प्रस्तावाची कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करून त्यानंतर नियमानुसार केंद्र शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार आहे.या प्रस्तावाला अमरावती जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींचा ठोस आणि व्यापक पाठिंबा मिळाला असून, त्यामुळे या उपक्रमाला राजकीय तसेच सामाजिक स्तरावर मोठी ताकद प्राप्त झाली आहे. अमरावती जिल्ह्याचे राज्यसभा खासदार श्री. अनिलजी बोंडे, माजी खासदार सौ. नवनीतजी राणा, माजी राज्यमंत्री आमदार श्री. बच्चूभाऊ कडू, आमदार श्री. रविभाऊ राणा, माजी राज्यमंत्री आमदार श्री. प्रविण पोटे पाटील, आमदार श्री. संजयराव खोडके, आमदार सौ. सुलभाताई खोडके, आमदार श्री. श्रीकांतभाऊ भारतीय, आमदार श्री. प्रतापदादा अडसड, आमदार श्री. प्रविणभाऊ तायडे, आमदार श्री. राजेशभाऊ वानखडे, आमदार श्री. चंदूभाऊ यावलकर, आमदार श्री. केवलराम काळे , आमदार श्री. गजाननभाऊ लवटे, आमदार ॲड. श्री. किरणराव सरनाईक, आमदार श्री. धिरज भाऊ लिंगाडे यांनी या प्रस्तावाच्या भूमिकेला सशक्त पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या पातळीवरही या प्रस्तावासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून,केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्याकडून प्रस्तावाच्या अनुषंगाने सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे संस्थेने नमूद केले आहे. ६ जुलैला राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण दिवस म्हणून मान्यता मिळाल्यास त्याचा उपयोग केवळ शासकीय दिनविशेषापुरता मर्यादित न राहता देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि वैचारिक सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी करता येईल, अशी संस्थेची भूमिका आहे. संत गुलाबराव महाराजांच्या नावाने दिव्यांग सशक्तीकरणाच्या विविध योजना, पुरस्कार, प्रोत्साहनपर उपक्रम, साहित्यिक व वैचारिक कार्यक्रम तसेच प्रेरणादायी सामाजिक कार्य सुरू करण्याची संकल्पनाही यामागे आहे. त्यामुळे एका संताच्या जयंतीला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होण्यासोबतच देशातील दिव्यांग बांधवांच्या क्षमतांचा सन्मान करणारा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी करून घेणारा व्यापक राष्ट्रीय उपक्रम उभा राहू शकतो.प्रज्ञाचक्षु GLOBAL WISDOM FORUM चे हे महत्त्वाकांक्षी कार्य श्री. माधुर्य विस्मय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्यात येत असून, संत गुलाबराव महाराजांचे कार्य आणि साहित्य केवळ एका प्रदेशापुरते किंवा एका समाजघटकापुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर पोहोचावे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संत गुलाबराव महाराजांनी धर्मसमन्वय, भक्ती, वेदांत, वैचारिक स्वातंत्र्य, सामाजिक जागृती, अंधश्रद्धेविरोधी दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार यांचा समन्वय साधत समाजाला व्यापक आणि विवेकनिष्ठ दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणे ही केवळ अमरावती किंवा विदर्भासाठी अभिमानाची बाब नसून, दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेकडे पाहण्याच्या सामाजिक दृष्टिकोनालाही नवी दिशा देणारी बाब ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. हा प्रस्ताव केंद्र शासनाने मान्य केल्यास संतभूमी अमरावतीची राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र आणि गौरवपूर्ण ओळख निर्माण होण्यासोबतच संत गुलाबराव महाराजांच्या साहित्याचा व विचारांचा देशभर प्रचार-प्रसार होण्यास मोठी चालना मिळणार आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास विद्यार्थी, संशोधक, साहित्यिक, अध्यात्मिक अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना करता यावा, तसेच पुढील पिढीला त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेशी संबंधित असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी आपल्या प्रज्ञा, साहित्य आणि चिंतनातून मांडलेले विचार पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांसारख्या समाजप्रबोधनाच्या व्यापक परंपरेशी जोडले जातात, अशी संस्थेची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्यास अमरावती जिल्ह्याच्या संतपरंपरेची माहिती देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी, दिव्यांग बांधव तसेच नागरिकांना या प्रेरणादायी कार्याची ओळख होऊ शकेल. संस्थेचे अध्यक्ष श्री. विस्मय ठाकरे यांनी संस्थेच्या भौतिक विस्तारापेक्षा वैचारिक आणि सामाजिक प्रगतीला अधिक महत्त्व दिले असून, संत गुलाबराव महाराजांचा विचार शासनाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल संस्थेसाठी समाधान आणि आनंदाची बाब असल्याचे व्यक्त केले आहे.
