मोर्शी/ तालुका प्रतिनिधी
सालबर्डी येथून आलेल्या मारुती महाराजांच्या पालखीचे निंभार्णी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी गावात दाखल होताच ग्रामस्थ व भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.यावेळी दिलीपराव इसळ यांच्या घरी पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांमुळे मिरवणुकीला विशेष शोभा आली.मारुती महाराजांच्या जयघोषाने निंभार्णी परिसर भक्तिमय झाला होता. गावातील विविध ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. पालखी सोहळ्यादरम्यान ग्रामस्थांनी श्रद्धेने पूजन करून मारुती महाराजांचे आशीर्वाद घेतले.निंभार्णी गावातील फेरी पूर्ण झाल्यानंतर मारुती महाराजांची पालखी ममदापूर-भारवाडीच्या दिशेने पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाली. यावेळी ग्रामस्थ व भाविकांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
