एस.आय. प्रशांत गावणेर यांच्याविरोधात आयुक्तांकडे तक्रार; आर्थिक व्यवहार,
वाहन वापर व बिलांची तपासणी करण्याची मागणी
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील एस.आय. प्रशांत गावणेर यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात विविध गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार विनोद नारायणराव पत्रे यांनी मनपा आयुक्तांकडे केलेल्या तक्रार अर्जातून केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सन २०२३ पासून मनपाच्या वाहनांसाठी करण्यात आलेल्या इंधन खर्चाच्या बिलांमध्ये कथित अनियमितता आहे. संबंधित इंधन बिलांवरील GST तपशील, पेट्रोल पंपाची बिले, प्रत्यक्ष इंधन पुरवठा, वाहनांचे लॉगबुक, किलोमीटर रीडिंग तसेच मनपाच्या लेखा नोंदी यांची परस्पर पडताळणी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.तसेच एका अपघातग्रस्त अथवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असलेल्या क्रॉप ऑटोचा शहरातील धुवारणीच्या कामासाठी वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर वाहनाची आर.सी., फिटनेस, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पाच लाखांच्या आगाऊ रकमेच्या बिलांचाही मुद्दा
जेसीबी, स्विपिंग मशीन,टॉयलेट टँक सफाईची वाहने आणि जटायू वाहनांच्या इंधन खर्चासंदर्भात आगाऊ रक्कम मंजूर करून प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त रकमेची बिले सादर व मंजूर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वाहनांचे लॉगबुक, इंधन नोंदवही, पेट्रोल पंपाची बिले आणि लेखा विभागातील मंजुरीच्या नोंदी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्मचारी उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह
काही कर्मचारी नियमितपणे कामावर उपस्थित नसतानाही त्यांचे वेतन सुरू असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यासंदर्भात बायोमेट्रिक हजेरी, उपस्थिती रजिस्टर, ड्युटी चार्ट आणि वेतन देयकांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय वाहनचालक व हेल्पर यांच्या नियुक्तीत आवश्यकता, मंजूर पदसंख्या आणि प्रत्यक्ष कामकाज यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली असून, वाहनचालक नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रार देऊनही कारवाई नाही
वरील प्रकाराबाबत दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मनपाकडे पुराव्यांसह तक्रार सादर करण्यात आली होती; मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय तसेच कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी आणि मनपाच्या निधीचे नुकसान झाले असल्यास संबंधितांकडून वसुली करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याचे मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे.दरम्यान तक्रारीतील आरोपांची सत्यता स्वतंत्र चौकशीतून स्पष्ट होणे अपेक्षित असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बाजूही तपासणीनंतर समोर येणे महत्त्वाचे आहे.
