दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर गावात गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे लिकेज थेट नालीच्या गटारात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना गटारमिश्रित पाणी प्यावे लागत असून अनेकांना पोटाचे आजार होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुख्य नालीमध्ये नळ योजनेचा पाईप लिकेज झाला आहे.
नळ आल्यावर लिकेजमधून पाणी बाहेर येते आणि नळ बंद झाल्यानंतर त्याच पाईपमधून नालीतील सांडपाणी पाईपलाईनच्या आत शिरते. दुसऱ्या दिवशी तेच दूषित पाणी नागरिकांच्या घरात पुरवठा केले जाते.या प्रकारामुळे गावात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी प्यायल्याने अनेकांना पोटदुखी, जुलाब यासारखे आजार होत आहेत.

याबाबत गावातील आकाश खडसे यांनी सांगितले की, अशोक गावंडे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच यांना प्रत्यक्ष स्थळ दाखवून लिकेजबाबत कळविले होते. मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जुने कनेक्शन असतानाही ग्रामपंचायतीने नवीन कनेक्शन दिले, मात्र जुने लिकेज असलेले कनेक्शन नालीमध्येच तसेच सोडून दिले. ते बंद करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनच गावाला गटाराचे पाणी पुरवत आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.या प्रकरणावरून भूषण खडसे आकाश खडसे, अक्षय पुंड, अनिकेत तुमडम, संजय मारबदे, अमोल थोरात, अमोल मारबदे, अतुल शेंडे, सागर जेठे, संकेत ठाकरे, संकेत भगत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ लिकेज दुरुस्त करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
