माहूर/ संजय घोगरे
अलीकडेच जालना येथे उपोषणकर्त्यांना डिवायएसपी कुलकर्णी यांनी लाथ मारल्याची घटना घडली होती. आणि त्यामुळे खाकीवर ग्रहण लागल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्याच खाकीतील माणुसकीचे वेगळे दर्शन माहूर येथे पाहायला मिळाले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे माहूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. याच दरम्यान पावसाच्या संततधारेमुळे पैनगंगा नदीला पूर आला आणि विदर्भ–मराठवाडा यांचा संपर्क तुटला. अनेक भाविक नदीच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले होते. जवळपास २४ तासानंतर पूर ओसरल्यानंतर जेव्हा वाहतूक सुरू झाली, तेव्हा पुलाची अत्यंत दयनीय अवस्था उघड झाली.मोठमोठे खड्डे पडल्याने भाविकांना जीव मुठीत धरून पुलावरून जाण्याची वेळ आली होती. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी ठेकेदारांनी पुढाकार घेणे अपेक्षित होते, कारण दुसऱ्या पुलाचे काम सुरू असून त्यांच्याकडे पुरेसा साहित्यसाठा उपलब्ध होता. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.या गंभीर परिस्थितीची दखल घेत माहूर पोलिस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेतला. खड्ड्यांमध्ये तातडीने मुरूम व माती टाकून पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली.यावेळी किनवट येथील होमगार्ड माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एस.के. चव्हाण ,शेख ताजुद्दीन, ए. बी. राठोड एस. बी. मेकलवार यांनी सहकार्य केले.जर पोलिस प्रशासनाने योग्य वेळी पुढाकार घेतला नसता, तर मोठा अपघात होऊन अनेक भाविकांचे जीव धोक्यात आले असते. माहूरगडावर आलेल्या भाविकांकडून या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे. खाकी वर्दीमध्ये लपलेली माणुसकी या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
