दर्जेदार आणि सुरळीत वीज पुरवठ्यावर विचारमंथन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात उद्योजकांची भूमिका अत्यंत मोलाची असून, त्यांना दर्जेदार, अखंडित आणि पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावून भविष्यातील वाढत्या उद्योगांना गती देण्यासाठी ठोस नियोजन केले जाईल, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.
विद्युत भवन, अमरावती येथे मंगळवार (दि. २९ सप्टें. ) विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत महावितरणची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणचे मुख्य अभियंता संजिव भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, रुपेश टेंभुर्णे, अनिल काळे, सातुर्णा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विरेंद्र लढ्ढा, अमरावती औद्योगिक वसाहतीचे आशिष सावजी, नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अफाक सुभेदार आणि अमरावती टेक्सटाईल्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सुरेंद्र पाटील यांच्यासह अनेक उद्योजक व ग्राहक उपस्थित होते. या वेळी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, दर्जेदार वीजपुरवठा, फीडर व उपकेंद्रांची क्षमता, व्होल्टेजचा दर्जा, नवीन वीज जोडण्या आणि भविष्यातील वाढती मागणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी श्री. औंढेकर यांनी सांगितले की, अमरावती एमआयडीसीसाठी ५ किलोमीटर लांबीची ३३ केव्ही ची भूमिगत केबल वाहिनी टाकून २२० केव्ही अमरावती उपकेंद्र येथून बॅकफिडिंगची सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या वाहिनीचे काम पूर्ण झाले असून ती कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे आता अमरावती एमआयडीसीला २२० केव्ही कोंडेश्वर उपकेंद्र आणि २२० केव्ही अमरावती उपकेंद्र असे दोन मजबूत पर्याय उपलब्ध होऊन अखंडित वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील ओव्हरलोडची समस्या दूर करण्यासाठी आणि मोठ्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी २२० केव्ही डवरगाव या अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही वाहिन्यांसाठी २१ मीटर उंचीचे मोनोपोल स्ट्रक्चर उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, तांत्रिक दोष तात्काळ दूर करण्यासाठी अमरावती व सातुर्णा औद्योगिक वसाहतीसाठी एक आणि नांदगाव पेठ वसाहतीसाठी एक, अशी दोन स्वतंत्र वाहने आणि समर्पित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.औद्योगिक क्षेत्रासोबतच अमरावती शहरातील विजेचा ओव्हरलोड कमी करण्यासाठी २०० केव्हीए क्षमतेची १५० नवीन रोहित्रे मंजूर करण्यात आली असून, यापूर्वी ५० रोहित्रे आधीच उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भविष्यातील वाढत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कसाठी २२० केव्हीचे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारले जाणार आहे. तसेच, कापूसतळणी (नांदगाव पेठ) येथे महापारेषणतर्फे ४०० केव्ही क्षमतेच्या नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम वेगाने सुरू असून, आगामी मार्च महिन्यापर्यंत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा विश्वासही संचालक धनंजय औंढेकर यांनी व्यक्त केला..
