‘पद्मश्री’ सन्मानाने जनार्दन बोथे गुरुजी गौरविले
डॉ. मनीष गवई यांनी शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व संविधान उद्देशिका देऊन केला सत्कार
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील श्री गुरुकुंज आश्रम, मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अखंड वाहक आणि ज्येष्ठ गुरुदेव भक्त श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना महामहिम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील प्रतिष्ठेचा नागरी सन्मान ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला.समाजप्रबोधन, ग्रामविकास, मानवता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या प्रसारासाठी केलेल्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी दिल्लीत अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी जनार्दन बोथे गुरुजी यांचा शाल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन विशेष सत्कार केला. त्यांनी बोथे गुरुजींच्या कार्याचे कौतुक करत हा सन्मान संपूर्ण विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.जनार्दन बोथे गुरुजी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतावादी विचारांचा प्रचार-प्रसार ग्रामीण भागापासून देशभरात केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून समाजात सद्भावना, सेवा आणि संस्कारांची जोपासना केली जात आहे.या सन्मानामुळे अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातून बोथे गुरुजींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
