वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अपघाताचा वाढता धोका.
चौपदरीकरणासोबत दुभाजक, मर्क्युरी लाईट व स्वागत कमानी उभारण्याची शहरवासीयांची मागणी.
नांदगाव खंडेश्वर | उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानक परिसरापासून श्री खंडेश्वर मंदिरापर्यंतच्या नांदगाव–चांदूर रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असून या मार्गाच्या मध्यभागी दुभाजक (डिव्हायडर) उभारण्यात यावेत, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. या मार्गालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने तसेच वाहनांची अनियंत्रित पार्किंग होत असल्याने नागरिकांना पायी चालणेही धोकादायक बनले आहे.
या मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अनेक दुकानदारांनी दुकानांसमोर टिनचे शेड उभारले असून दुकानाचे फलकही रस्त्यालगत लावले आहेत. याशिवाय ऑटो-रिक्षाचालक, नासत्यांचे हातगाडी लावत असतात आणि फलविक्रेतेही रस्त्याच्या कडेला वाहने व स्टॉल उभे करीत असल्याने रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी वाहनांची सतत कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

नांदगाव खंडेश्वर येथून चांदूर रेल्वे, पुढे कुऱ्हा मार्गे कौंडण्यपूर व आर्वीकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे नियोजनबद्ध सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चांदूर रेल्वेपर्यंत पोहोचले असून लवकरच नांदगाव खंडेश्वर शहरातूनही कामाला सुरुवात होणार आहे. या संधीचा लाभ घेत बसस्थानक परिसरापासून श्री खंडेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारण्यात यावेत आणि दोन्ही बाजूंना मर्क्युरी लाईट बसवून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे,अशी मागणी पुढे आली आहे.तसेच बसस्थानक परिसरात आणि श्री खंडेश्वर मंदिराजवळ भगवान श्री खंडेश्वर यांच्या नावाने दोन आकर्षक लोखंडी स्वागत कमानी उभारण्यात याव्यात,अशीही मागणी नांदगाव खंडेश्वर शहरवासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक सुधारणा समाविष्ट कराव्यात,अशी मागणी नांदगाव येथील नागरिकांनी केली आहे.
