१२ ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे नियोजन
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण मास मांड (अखंड भजन) शुभारंभ तसेच अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण मास मांडची सुरुवात सकाळी ५ वाजता लहान मंदिरात ढाल बसवून करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य मंदिरात या मांडीचा शुभारंभ महाराजांच्या गणाने विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडणार आहेत. तसेच दुपारी ४ वाजता संस्थानच्या वतीने अमावस्येनिमित्त भव्य चंदनउटी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियंत्रणाखाली महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रावण मास मांडमध्ये अवधूत भजन मंडळांचा सहभाग-
श्रावण मास मांडदरम्यान बाहेरगावातील विविध अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. यासाठी संस्थानच्या वतीने भजन मंडळांच्या पाळीचे नियोजन करण्यात आले आहे.सहभागी अवधूत भजन मंडळांसाठी संस्थानच्या वतीने चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी मंडळांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार असून, नवीन सहभागी होणाऱ्या भजन मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येणार आहे.
भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची सुविधा-
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रसाद (भोजन) वितरण करण्यात येत आहे.भाविकांनी संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद देणगीची पावती घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इच्छुक अन्नदानदाते संस्थानला अन्नदानाची देणगी देऊन या सेवेत सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थानशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी व समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
