चार दिवस धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती; पालखी सोहळा व महाप्रसादाने सांगता.
वेदपठण, हरिपाठ, भजन, प्रवचनातून संत विचारांचा जागर
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
ज्ञानेश्कन्या श्री संत गुलाबराव महाराज संस्थान (जन्मस्थान), श्रीक्षेत्र लोणी (टाकळी) येथे आयोजित करण्यात आलेला श्री संत गुलाबराव महाराज जन्मोत्सव आनंद सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आयोजित या चार दिवसीय सोहळ्यात परिसरासह विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी सहभाग घेत संतांचे दर्शन घेतले.सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी नित्य स्थापना, दुपारी गुलाब गौरव पारायण, तसेच सायंकाळी हरिपाठ व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संत गुलाबराव महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात अध्यात्माची जागृती व्हावी, या उद्देशाने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.समारोपाच्या दिवशी मूर्ती अभिषेक, वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वेदपठण, पालखी सोहळा आणि श्री संत गुलाबराव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रवचन यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन श्री संत गुलाबराव महाराज संस्थान (जन्मभूमी), लोणी (टाकळी) व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि भाविकांनी परिश्रम घेतले. संपूर्ण परिसर चार दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाला. संतांच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात हा सोहळा यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
