“सावंगपूरचे राजे विठोबा कराहो बादशाही!
मन माझं मोहिलं, माय माझी विठ्ठल-रुख्माई!”
आषाढी गुरुपौर्णिमा व गुरुपूजन सोहळ्याचे भक्तिभावात आयोजन
चांदूर रेल्वे (तालुका प्रतिनिधी)
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे आषाढी गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त पारंपरिक “चंदन-उटी” उत्सव व गुरुपूजन सोहळ्याचे भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे. श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने दि. २९ जुलै २०२५, बुधवार रोजी दुपारी ४.०० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत चंदन-उटी सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दि. ३० जुलै २०२५, गुरुवार रोजी सकाळी गुरुपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अवधूत महाराजांना भाविक विठोबा स्वरूपातही पूजतात, आषाढी गुरुपौर्णिमेला या पवित्र स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. संस्थानच्या परंपरेनुसार दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून, यंदाही गावातील तसेच बाहेरगावातील हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या निज ज्येष्ठ अमावस्येच्या चंदन-उटी उत्सवाला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. कापूर प्रज्वलित करून आपल्या मनोकामना व्यक्त करत भाविकांनी भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. त्याच भक्तिभावाच्या वातावरणात आता आषाढी गुरुपौर्णिमेचा चंदन-उटी उत्सव भाविकांसाठी पुन्हा एकदा आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.या सोहळ्यास संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच विश्वस्त वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रवीण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर आणि स्वप्नील चौधरी उपस्थित राहणार असून, विश्वस्त मंडळ उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.चंदन उटी कार्यक्रमानंतर संस्थानच्या महाप्रसाद (अन्नदान) समितीच्या वतीने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.अमरावती आणि चांदुर रेल्वे येथून श्री क्षेत्र सावंगा विठोबा करिता नियमित दररोज सकाळी आणि संध्याकाळी एस.टी.बसेस चालू असून भाविकांनी अवैध वाहनांनी प्रवास न करता एस.टी.बसनी सुरक्षित प्रवास करून एस.टी.महामंडळला सहकार्य करावे,अशी भाविकांना विनंती करण्यात आली आहे.या पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना तन, मन आणि धनाने सहभागी होण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
